आदिवासी हे मूळनिवासीच आहेत
By admin | Published: October 25, 2015 02:50 AM2015-10-25T02:50:02+5:302015-10-25T02:50:02+5:30
भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते ते मूळनिवासी आहेत.
मान्यवरांचा सूर : ‘आदिवासी : मूळनिवासी, हिंदू की वनवासी’ विषयावर चर्चा
नागपूर : भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते ते मूळनिवासी आहेत. त्यामुळे आदिवासींना मूळनिवासीच समजले जावे, अशी आग्रही भूमिका व्यक्त करतानाच हिंदू म्हणून त्यांच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करू नये. आदिवासींवर हिंदू धर्म लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो आदिवासींना अमान्य आहे. आदिवासींचा धर्म हिंदू नाही, त्यांचा धर्मच नाही. आदिवासी हे मूळनिवासीच आहेत, असा सूर चर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने ‘आदिवासी कोण : मूळनिवासी, हिंदू की वनवासी’ विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुलातील चिंतनकक्षात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठानचे सरचिटणीस रमेश बोरकुटे, सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. या चर्चेत आदिवासी समाजातील कार्यकर्ते, युवा आणि नेत्यांनीही सहभाग नोंदवित हिरीरीने मते व्यक्त केली. आदिवासींची संस्कृती, धर्म, परंपरा, हक्क याबाबत वेगवेगळी विधाने केली जातात. न्यायालयाने आदिवासींचा धर्म हिंदू नाही, असा निर्णय दिलेला असतानाही त्यांच्यावर हिंदू धर्म थोपविला जातो. त्यांना वनवासी म्हटले जाते. मुळात आदिवासी हिंदूही नाहीत आणि वनवासीही नाहीत तर ते मूळनिवासी आहेत. डॉ. विनायक तुमराम म्हणाले, आदिवासींची ओळख दिली तर आदिवासींवर आक्षेप घेतले जातील वा न्याय मिळेल. परिस्थितीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगण्याचे मार्ग शोधले तो माणूस म्हणजेच मूळनिवासी आहे. त्यामुळे आदिवासी हे मूळनिवासी आहेत. त्यामुळे हिंदू वा वनवासी असल्याचा प्रचार चुकीचा आहे. ज्यांनी आम्हाला वनवासी ठरविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापासून सावध होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एल. के. मडावी म्हणाले, आमच्या साऱ्याच परंपरा आणि जगण्याची शैली, रीतीरिवाज वेगळे आहेत. मूळनिवासी म्हणून आमच्यावर अत्याचार केले जातात आणि मूळनिवासी असण्याचा दर्जाही दिला जात नाही. वनवासी म्हणून आमच्या हक्कांवरच गदा आणली जात आहे. आमचा धर्म फक्त आदिवासी आहे. हिंदू नाही. त्यासाठी सर्व आदिवासींचे एकत्रिकरण केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
न्यायालयाच्या निर्णयानुसार आदिवासी हिंदू नाहीत. त्यांना वनवासी म्हणणे म्हणजेच कागदोपत्री संपविण्याचा प्रयत्न आहे. आदिवासींवर सातत्याने अन्याय आणि अत्याचार करण्यात आला. त्यांच्या हक्कांना डावलण्यात आले. जातीच्या भरवशावर त्यांचे अधिकार नाकारण्यात आले. आता वनवासी, आदिवासी अशा भ्रमात आदिवासींची संस्कृती संपविण्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सारा आदिवासी समाज एकत्र होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या चर्चासत्रात विनोद मून, श्रीधर जोशी, कृष्णा पेंदास, सिद्धार्थ खोब्रागडे, श्रीराम बढे, वि. दे. ओरके, सुजित जाधव, जे. एन. भोरजार, यशवंत घुमे, लक्ष्मण शेडाम, बाबासाहेब कंगाले, सागर खादीवाला, धनंजय मांडवकर, माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब कंगाले, सुवर्णा वरखडे आदींनी मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)