रँडम व विस्थापित पदवीधर शिक्षकांचे समायोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:07+5:302021-08-25T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : राज्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली करण्यात आली. या प्रक्रियेत असंख्य शिक्षक विस्थापित व रँडम राऊंडमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : राज्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली करण्यात आली. या प्रक्रियेत असंख्य शिक्षक विस्थापित व रँडम राऊंडमध्ये गेले. अनेक शिक्षकांना चुकीच्या बदली धोरणाचा फटका बसला. त्यामुळे रँडम व विस्थापित पदवीधर शिक्षकांना प्राथमिकता देत योग्य समायोजन करा, अशी मागणी अन्यायग्रस्त बदली संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शासन परिपत्रक ४ सप्टेंबर २०१९ अन्वये विस्थापित आणि रँडम राऊंडमधील सर्व शिक्षकांना समायोजनाची संधी होती. २०२० मध्ये पवित्र पोर्टल, नवीन नियुक्ती व आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना रुजू होण्याबाबतच्या हालचाली वाढल्या. दुसरीकडे समायोजन करण्याची वेळ आली असता, केवळ सहायक शिक्षकांनाच सामावून घेण्यात आले. पदवीधर विषय शिक्षकांवर पुन्हा अन्याय झाला. सहायक शिक्षक असोत वा पदवीधर शिक्षक असो सर्वांना समान संधीने समायोजन करणे आवश्यक असताना, पदवीधर शिक्षकांबाबतच्या निर्णयावर वेळ मारून नेण्यात आली. आता पुन्हा ३० जुलै २०२१ अन्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन विषय शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेत अन्यायग्रस्त पदवीधर शिक्षकांनीसुद्धा अर्ज केलेले असून, शासन-प्रशासनाची दिशाभूल करण्याचे काम शिक्षण विभागात केले जात आहे, असा आरोप अन्यायग्रस्त बदली संघर्ष समितीने केला आहे. नियमानुसार न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.