गोंधळात पार पडले शिक्षकांचे समायोजन

By admin | Published: September 15, 2016 02:44 AM2016-09-15T02:44:53+5:302016-09-15T02:44:53+5:30

संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी गोंधळात पार पडली.

Adjustment of teachers who were confused | गोंधळात पार पडले शिक्षकांचे समायोजन

गोंधळात पार पडले शिक्षकांचे समायोजन

Next

सदोष संचमान्यता दुरुस्तीची मागणी : मराठी माध्यमाच्या ६३ शिक्षकांचे समायोजन
नागपूर : संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी गोंधळात पार पडली. संच मान्यताच दोषपूर्ण असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. शिक्षणाधिकाऱ्याला घेराव करून समायोजनाची प्रक्रिया बंद पाडण्यासंदर्भात मागणी केली. समायोजन प्रक्रियेवर शिक्षकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे तब्बल एक तास प्रक्रिया खोळंबली होती. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मराठी माध्यमाच्या ६३ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.
२०१५-१६ च्या संचमान्यतेत जिल्ह्यातील २४१ अतिरिक्त ठरविण्यात आले होते. अतिरिक्त ठरलेल्या ७३ शिक्षकांनी आपले आक्षेप शिक्षणाधिकाऱ्यांकडे नोंदविले. आलेल्या आक्षेपांची सुनावणी घेऊन २१७ अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात मराठी हिंदी आणि उर्दु माध्यमाच्या ९२ जागा रिक्त आहेत. अंतिम यादीअंती अतिरिक्त शिक्षकांची संख्या लक्षात घेता, समायोजनाच्या प्रक्रियेत अडचणी येणार असल्याचे संकेत शिक्षकांनी दिले होते. बुधवारी सकाळी ९.३० वाजतापासून सेंट जोसेफ स्कूलमध्ये आॅनलाईन समायोजनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी अनेक शिक्षकांनी संच मान्यतेचे निकष पाळले गेले नसल्याची ओरड केली. तांत्रिक त्रुटी आढळून आल्या.
सेवाज्येष्ठता यादी डावलण्यात आली. जातीचे प्रवर्ग बदलल्याची तक्रार शिक्षकांची होती. नियुक्तीच्या तारखेचा घोळ पुढे आला. पदवीधर शिक्षकाची मान्यता नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आल्याची ओरड शिक्षकांनी केली.
शबाना अंजूम, सीमा ठाकूर या शिक्षकांनी आमचे आक्षेप अधिकाऱ्यांनी ध्यानातच घेतले नसल्याची ओरड करीत, न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. या समस्यांमुळे शिक्षकांच्या विविध संघटनांनी शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना घेराव करून, जाब विचारला.
यावेळी शिक्षकांनी निदर्शने करून, समायोजनाची प्रक्रिया बंद पाडण्याची मागणी केली. या गोंधळामुळे एक तास प्रक्रिया थांबविण्यात आली होती. (प्रतिनिधी)

संचमान्यता दोषपूर्ण
संचमान्यताच दोषपूर्ण झाल्याने समायोजन प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी आक्षेप घेतले. अनेकांचे संवर्ग बदलले, सेवाज्येष्ठता यादी डावलण्यात आली. या आक्षेपाची दखल न घेता शिक्षण विभागाने समायोजनाचे आदेश काढले. या प्रक्रियेत अनेक त्रुटी असून, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही समायोजनाची प्रक्रिया राबवून शिक्षकांना नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला. सदोष संचमान्यता दुरुस्त होईतोवर समायोजनाची प्रक्रियाच बंद पाडावी, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, काँग्रेस शिक्षक सेलचे सचिव बाळा आगलावे, शिक्षक भारतीचे दिलीप तडस यांच्यासह देवेंद्र सोनटक्के, ओमप्रकाश धाबेकर, गिरधारी चौव्हान, परिदास पांगुळ, रियाज काझी, सतीश दामोधरे, सुनील चौधरी, नितीन टवले, राजेश शिंदे, प्रमोद शिंगारे या शिक्षकांनी केली.

तथ्याला धरुन आक्षेप नाही
शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आक्षेपासाठी चार दिवसांची मुदत दिली गेली. त्यांची सुनावणी सुद्धा झाली. आज समायोजनाच्या प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी आक्षेप घेतले, त्यांनी आपले आक्षेप दिलेल्या वेळेत सादर करणे गरजेचे होते. ज्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आले ते मुद्दे तथ्याला धरून नव्हते. समायोजनाची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आल्याने अतिशय पारदर्शीपणा होता. मराठी माध्यमाच्या शिक्षकांचे तीन राऊंड झाले. ६३ शिक्षकांचे समायोजन झाले. पुढचा राऊंड शासनाचा आदेश आल्यानंतर घेण्यात येईल.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

Web Title: Adjustment of teachers who were confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.