‘६०:४०’ ला प्रशासनाचा ब्रेक
By admin | Published: July 29, 2016 02:43 AM2016-07-29T02:43:33+5:302016-07-29T02:43:33+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून ‘६०:४०’ परीक्षा प्रणाली सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता.
कुलगुरुंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ बारगळला :
‘मास कॉपी’च्या भीतीपोटी घेतला निर्णय
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून ‘६०:४०’ परीक्षा प्रणाली सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे हे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होते. परंतु ‘मास कॉपी’चा धोका लक्षात घेता या प्रणालीला सुरू होण्याअगोदरच ‘ब्रेक’ लावण्याचा कुलगुरूंनीच निर्णय घेतला आहे.
नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा ताण लक्षात घेता, यंदापासून ‘६०:४०’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार ६० टक्के गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येणार होती. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार होते, तर ४० टक्के गुणांच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात येणार होती. यामुळे विद्यापीठावरील ताण कमी होऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतील, अशी विद्यापीठाची भूमिका होती. परंतु ज्यावेळी अधिकाऱ्यांनी खोलात जाऊन विचार केला तेव्हा या प्रणालीचे दुष्परिणाम समोर आले. वस्तुनिष्ठ प्रणालीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांप्रमाणे ‘ओएमआर’ प्रणालीत उत्तरे द्यायची होती, म्हणजेच केवळ योग्य उत्तराच्या पर्यायासमोर खूण करायची होती. हा वस्तुनिष्ठ पेपर ‘आॅफलाईन’ राहणार होता. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रश्नांचा वेगळा क्रम असणारा पेपर काढणे कठीण होते.
वस्तुनिष्ठ पेपरमध्ये ‘मास कॉपी’ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. एखाद्या केंद्रावरून प्रश्न ‘व्हॉटस् अॅप’ किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परीक्षा केंद्राबाहेर गेले तर त्यांची उत्तरे सहज मिळणे शक्य होते. या उत्तरांना केवळ खूण करण्यासाठी ५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे.
विशेषत: ग्रामीण भागात याचा जास्त धोका होता, शिवाय संबंधित निर्णय हा धोरणात्मक निर्णयात मोडतो. सध्या प्राधिकरण अस्तित्वात नसल्यामुळे पुढे विद्यापीठ अडचणीत येण्याची शक्यता होती. (प्रतिनिधी)