प्रशासनाचे भाजपाशी सख्य, शिवसेनेशी दुरावा
By admin | Published: April 13, 2017 03:09 AM2017-04-13T03:09:02+5:302017-04-13T03:09:02+5:30
जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर सध्या शिवसेना चांगलीच नाराज आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्याचा अनुभवही आला.
जिल्हा परिषद : शिवसेनेची प्रशासनाशी झोंबाझोंबी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर सध्या शिवसेना चांगलीच नाराज आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्याचा अनुभवही आला. जि.प.चे प्रशासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ऐकतच नसल्याचा आरोप करीत प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. बैठकीत उपाध्यक्ष शरद डोणेकर चांगलेच आक्रमक होत, यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या हाताखालील अधिकारी ऐकत नसतील तर याला काय म्हणावे ? अशा शब्दात सीईओंची कानउघडणी केली. त्यामुळे शिवसेनेचे जि.प.तील पदाधिकारी, सदस्य यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चांगलीच झोंबाझोंबी झाली. प्रशासनाचे भाजप पदाधिकाऱ्यांशी सख्य व शिवसेनेशी दुरावा असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला.
मुळात जि.प.च्या प्रशासनावर सर्वच सदस्य व पदाधिकारी नाराज आहेत. उघडपणे सदस्यांकडून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जाते. अधिकारी बेजबाबदार असल्यामुळेच आज समाजकल्याणच्या सायकली, शिलाई मशीन, कृषीचे साहित्य लाभार्थ्यांना मिळू शकले नाही. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पाणी टंचाईच्या कामांना अद्यापही सुरुवात झाली नाही.
टंचाईच्या काळात पाणीपुरवठा विभागाला कार्यकारी अभियंता मिळाला नाही. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपअभियंत्याची जागा आठ महिन्यापासून रिकामी आहे. प्रशासनाकडे टंचाईचे ६० लाख रुपये असताना, भूजल सर्वेक्षकांना वाहने उपलब्ध करून देऊ शक ले नाही. चौकशी समितीचा अहवाल अधिकारी वेळेवर देऊ शकत नाही. असे आरोप सर्व सदस्यांकडून प्रशासनावर होत आहे.
परंतु शिवसेनेला प्रशासनाने वैयक्तिक घेतल्याचे दिसते आहे. रामटेक पंचायत समितीत शिवसेनेच्या सभापतींच्या कार्यालयाला बीडीओंने कुलूप ठोकले. शिवसेनेच्या जि.प. सदस्य शोभा झाडे यांनी पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्याला माहिती मागितली असता, त्यांनी दिली नाही. त्यामुळे वृत्तपत्रात माहिती दिली नसल्याची बातमी छापून आल्याने, त्या विस्तार अधिकाऱ्याने जि.प. सदस्यांना दोन नोटीस बजावल्या. किरणापूर ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर भंगार विक्री केली. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी होती. ती स्थायी समितीच्या बैठकीत जाहीरपणे उघड झाली. (प्रतिनिधी)
शिवसेनेला पाडले एकटे
शिवसेनेबरोबरच भाजप व काँग्रेसचे सदस्यही प्रशासनावर नाराज आहे. उघडपणेही बोलतात. परंतु जेव्हा शिवसेनेचे सदस्यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी झोंबाझोंबी झाली, तेव्हा इतर पक्षाच्या सदस्यांनी आपली भूमिकाच मांडली नाही. उलट भाजप-काँग्रेसचे सदस्य एकत्र येऊन शिवसेनेची खिल्ली उडविताना दिसले.