तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्याने प्रशासन अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:08+5:302021-09-08T04:12:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली आहे. नागपुरात परत निर्बंध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली आहे. नागपुरात परत निर्बंध लावण्याची तयारी दाखविल्यानंतर मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. यादरम्यान चाचण्या व त्यांच्या विश्लेषणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विमला आर., मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण राहुल माकणीकर, उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली, निवासी जिल्हाधिकारी जगदीश कातकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सणासुदीच्या तयारीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर बाजारपेठात व घराबाहेर पडून खरेदी करत आहेत. त्यामुळे संक्रमणाची वाढ ही रुग्णसंख्येच्या दुहेरी संख्येत दिसत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता सर्वांनी अनुभवली. अशा स्थितीत तिसरी लाट टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून गर्दी होणाऱ्या इतर ठिकाणच्या वेळा कमी करण्याचा विचार प्रशासन करत असल्याचा अधिकाऱ्यांचा सूर होता.
वेळेवर पुढाकार आवश्यक -मनपा आयुक्त
साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत; परंतु नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे तिसरी लाट दारावर येऊन ठेपण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळेतच प्रतिबंध करणे गरजेचे आहे. मात्र, हे करण्यापूर्वी सर्व प्रभावित होणाऱ्या घटकांशी चर्चा करण्यात येईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
प्रवाशांच्या कोरोना चाचण्यांवर भर
रस्त्यांमार्फत होणाऱ्या आंतरराज्यीय प्रवाशांची अकस्मातरीत्या कोरोना चाचणी करणे यावर भर राहणार आहे. तसेच दंडाच्या कार्यवाहीला आणखी गतिमान करणे, ऑटो-रिक्षाद्वारे गर्दीच्या ठिकाणी कोरोनासंबंधी वेळोवेळी जाहीर घोषणा देणे या बाबींचीदेखील अंमलबजावणी होईल, असे बसवराज तेली यांनी स्पष्ट केले.
.