कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:12 AM2021-02-18T04:12:53+5:302021-02-18T04:12:53+5:30
वाडी : नागपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाडी नगर परिषद प्रशासन अॅक्शन ...
वाडी : नागपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाडी नगर परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. वाडी शहरात फिरताना नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. जे नागरिक कोविड नियमाचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिले आहे.
वाडीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या, विना मास्क वावरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात निगराणी पथक तयार करण्यात आले आहे. कोविड नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर व दुकानदारांवर ५०० ते २००० रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येत आहे. शहरातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी वैद्यकीय विभागातील अधिकारी व खासगी डाॅक्टरांची न.प. कार्यालयात बैठक घेतली. तीत नागरिकांच्या सहकार्यातून वाडी शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी खासगी डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी सर्दी, खोकला, ताप व श्वासोच्छवास अडचण असलेल्या रुग्णांची माहिती पालिका प्रशासनाला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.