कळमना मार्केटबाबत प्रशासन गंभीर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 09:00 PM2020-08-28T21:00:43+5:302020-08-28T21:01:56+5:30
कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. कॅबिनमध्ये बसून कारभार करण्याऐवजी मार्केट परिसरात फिरून कोरोनावर कसे नियंत्रण मिळविता येईल, यावर वरिष्ठ अधिकारी स्तरावर मंथन करण्यात आले. शुक्रवारी सर्वच बाजारपेठा बंद असतानाही स्वच्छता आणि साफसफाईवर भर देण्यात आला नाही. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे मार्केटमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा खुलासा झाला नाही.
लोकमतच्या बातमीची जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी यांना विचारण करण्यात आल्याची माहिती आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा-बटाटा बाजार अडतिया वेलफेअर असोसिएशन, कळमना धान्यगंज अडतिया, युवा अडतिया सब्जी असोसिएशन, कळमना होलसेल मिरची मार्केट असोसिएशन, कळमना फ्रूट मार्केट असोसिएशन, होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशन आदी सहा बाजार आहे. या बाजारांमध्ये दरदिवशी १४ ते १५ हजार लोकांची गर्दी आहे. प्रशासकाचा वरदस्त नसल्याने कुणीही सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. पावसाळ्यामुळे धान्य बाजारात गर्दी नसते, पण भाजी बाजार आणि फळ बाजारात दरदिवशी होणारी गर्दी नेहमीचीच आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची प्रशासकाची जबाबदारी आहे. पण ते बाजाराची पाहणी करण्याऐवजी कॅबिनमध्ये बसूनच कारभार करतात, असा आरोप नाव न सांगण्याच्या अटीवर काही व्यापाऱ्यांनी केला. कळमना मार्केटबाबत प्रशासक गंभीर नाही. प्रशासकाने पूर्वीपासूनच गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या असत्या तर आज मार्केटवर ही वेळ आली नसती, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
फळांच्या लिलावावेळी असते गर्दी
सध्या मोसंबीचा हंगाम सुरू आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त टेम्पोतून मोसंबी बाजारात येते. शनिवारी फळांचा लिलाव असतो. त्यावेळी शेतकरी, ग्राहक, व्यापारी आणि अडतियांची प्रचंड गर्दी असते. हजारापेक्षा जास्त लोक दाटीदाटीने उभे असतात. यातून कोरोना संसर्गाचा जास्त धोका असतो. अनेकजण लिलावातून कोरोना घेऊन गावाकडे परततात. या माध्यमातून गावागावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासक राजेश भुसारी यांनी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.