पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:06+5:302021-06-09T04:11:06+5:30
आंभोरा येथे प्रशिक्षण : ‘एसडीआरएफ’ टीमचा वैनगंगा नदीत सराव लोकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : पावसाळ्यात कुही तालुक्यातील काही गावांना ...
आंभोरा येथे प्रशिक्षण : ‘एसडीआरएफ’ टीमचा वैनगंगा नदीत सराव
लोकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : पावसाळ्यात कुही तालुक्यातील काही गावांना पुराचा फटका बसताे. त्यामुळे पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) जवानांनी आंभाेरा (ता. कुही) येथील वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात सराव केला असून, त्यांनी महसूल व पाेलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षणही दिले. यासाठी रबरी बाेटींसह इतर साधनांचा वापर करण्यात आला हाेता.
राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान साेमवारी (दि. ७) सकाळी आंभाेरा येथे दाखल झाले हाेते. या जवानांनी वैनगंगा नदीच्या पात्रात बाेटी टाकून स्वत: सराव केला व नदीकाठी असलेल्या गावांमधील काही तरुण (पट्टीचे पाेहणारे), पाेलीस पाटील, तलाठी, हाेमगार्ड, काेतवाल यांच्याकडून सराव करवून घेतला. यावेळी एसडीआरएफ टीमचे निरीक्षक पी. एम. नेमाणे व डी. एन. मंडल यांनी आपत्ती निवारणाबाबत विविध महत्त्वाच्या बाबीही समजावून सांगितल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी (महसूल) प्रमोद कदम, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एस. व्ही. सिरसाट, ओ. एस. शेंडे, एम. एन. पाटील, एन. वाय. गोखले, डी. पी. बेलेकर, जे. टी. शेख, एस. के. श्रीरामे, यू. पी. ठाकरे, एन. डी. जायभाय, कुहीचे तहसीलदार बाबाराव तीनघसे, भिवापूरचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज, नायब तहसीलदार रमेश पागोटे, प्रकाश हारगुडे व रूपेश अंबादे, मंडळ अधिकारी हिंदलाला उके, संजय टोटे, तलाठी महादेव डाखोरे, संताराम पाटील, हंसराज शेवळे, प्रफुल्ल झाडे, समीर शेंडे, आकाश शेंडे, ईश्वर नेवारे, शेखर शेंडे, भिवराव मेश्राम, घनश्याम तिजारे, वैभव वंजारी, कुलदीप वंजारी आदी उपस्थित होते.
...
आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण
या टीमचे निरीक्षक पी. एम. नेमाणे व डी. एन. मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली १० जवानांनी पाेलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह इतरांना वापरात नसलेल्या घरगुती वस्तूंपासून लाईफ जॅकेट व रबरी बोट तयार करणे, पोहणे, स्वतःचा जीव वाचविणे, बोट हाताळणे, खोल पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचविणे, पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींचे प्रत्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.