हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:19 PM2019-12-09T23:19:55+5:302019-12-09T23:25:35+5:30
सोमवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेत अधिवेशन काळात सामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले तसेच तयारीची पाहणीसुद्धा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रशासन सज्ज आहे. सर्व कामांना अंतिम रूप दिले जात आहे. दरम्यान सोमवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेत अधिवेशन काळात सामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले तसेच तयारीची पाहणीसुद्धा केली.
पटोले आणि गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेताना प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची माहिती घेतली. विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले की, अधिवेशनाच्या तयारीमुळे सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये. असुविधा होऊ नये. नागरिकांच्या पैशाची बरबादी होऊ नये. कामांची गुणवत्ता कायम ठेवणे आणि आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दर्जेदार खाद्यपदार्थांसह स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. विधानभवन परिसर, आमदार निवास, रविभवन व कर्मचाऱ्यांचे निवास परिसर येथे स्वच्छता व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासही सांगितले. त्यांनी सुरक्षेवर विशेष लक्ष देत विभागांनी आपसात समन्वय ठेवण्याचे निर्देशसुद्धा दिले.
बैठकीत विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल तेली-उगले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी. सरदेशमुख, अधीक्षक अभियंता (विद्युत) हेमंत पाटील, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुदेश मेश्राम, बीएसएनएलचे वाणिज्य अधिकारी संतोष सुरपाटणे, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, विधानसभेचे अवर सचिव रवींद्र जगदाळे, विधिमंडळाचे सुरक्षा अधिकारी महेश चिमटे आदी उपस्थित होते.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनासाठी तैनात महिला पोलीस कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. महिलांसाठी मोबाईल शौचालयाचे व्यवस्था करण्यासही त्यांनी सांगितले. महिला आमदारांच्या निवासाची व्यवस्था आमदार निवासाच्या पहिल्या माळ्यावर करण्यात आल्याच्या माहितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.
विधानभवनात ५० सीसीटीव्ही कॅमेरे
विधानभवन परिसराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फोटो घेणारी अत्याधुनिक प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी याबाबत माहिती दिली की, स्कॅनर मशीनसुद्धा लावण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अधिवेशनाच्या कालावधीत केवळ अधिकृत सुरक्षा पास असणाऱ्यांनाच आत प्रवेश दिला जाईल. विधानभवन परिसर, आमदार निवास, रविभवन आदी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
विधानभवनात वाहनांना बंदी
विधानभवनाच्या आत सर्वच वाहनांना बंदी राहील. मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत व आमदारांपर्यंत सर्वांनाच गेटपर्यंत वाहने आणता येईत. गेटवरून सर्वांनाच पायी विधानभवनाच्या इमारतीत यावे लागेल.
दुसऱ्या जिल्ह्यातून आणली वाहने
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, वाहन पुरेशी उपलब्ध आहेत. नागपूरसह इतर जिल्ह्यातूनही सरकारी वाहने आणण्यात आली आहेत. यासाठी खासगी टॅक्सी सुविधा उपलब्ध राहील. सर्व विभागांमध्ये समन्वय स्थापित करण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल.
दोन दिवसात तयारी पूर्ण
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सरदेशमुख यांनी संगितले की, तयारी अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसात सर्व कामे पूर्ण केली जातील. टेलिफोन व इंटरनेटची सुविधा मागणीनुसार उपलब्ध करण्यात येईल. वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. जनरेटरसुद्धा उपलब्ध राहतील.
२११ डॉक्टर, परिचारिकाही तैनात
आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले की,
अधिवेशनासाठी पुरेशा प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. २११ डॉक्टर व परिचारिकांचे पथक तैनात राहील. यादरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणावर डॉक्टर नाहीत, तेथील डॉक्टर न बोलावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.