कोरोना संक्रमण वाढण्यासाठी प्रशासन जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:17+5:302021-04-11T04:09:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाच्या शून्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाच्या शून्य नियोजनामुळेच कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. प्रशासनाने गेल्या १४ महिन्यांत कुठल्याही ठोस उपाययोजना न केल्यामुळेच कोरोनाचे संक्रमण वाढले आहे, असा आरोप नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण प्रचंड वाढले आहे. मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. आरोग्य सुविधांकडे लक्ष न दिल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी सांगितले की, मी जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. या दौऱ्यात हे स्पष्टपणे दिसून आले की, कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कुठलाही पुढाकार घेतलेला नाही. आजही आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत. कोरोनाचा आरटीपीसीआर रिपोर्ट यायला ५ ते ७ दिवस लागत आहेत. रिपोर्ट वेळेवर येत नसल्यामुळेसुद्धा पॉझिटिव्ह रुग्ण सुपर स्प्रेडर बनून फिरत आहेत. गावा-गावांमध्ये संक्रमण वाढत आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होत आहे. काटोल, नरखेडच्या रुग्णांना १०० किमी दूर असलेल्या अमरावतीत जावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानंतरही ग्रामीण भागात केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे पूर्ण भार मेडिकल व मेयोवर येत आहे. पत्रपरिषदेत आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, अजय बोढारे, सुनील मित्रा उपस्थित होते.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप
या वेळी बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले. ते म्हणाले, कामठीत २० बेड तयार करण्याच्या दिशेने जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही पुढाकार घेतला नाही. मौदा व कामठीत एका बँकेने पुढाकार घेतला. परंतु प्रशासनाकडूनच गांभीर्य दिसून येत नाही. या कामासाठी जिल्हा नियोजन समिती, खनिज निधी यातून मदत केली जाऊ शकते, परंतु जिल्हाधिकारी ती करत नाहीत.