नागपुरात मनोरुग्णांच्या मृत्यू सत्राने प्रशासन हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:38 PM2018-05-25T22:38:12+5:302018-05-25T22:38:42+5:30
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच आहे. गुरुवारी २४ मे रोजी आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. २१ दिवसांत सहा मनोरुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सहाही मृत्यू हे मेडिकलमध्येच उपचारादरम्यान झाल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच आहे. गुरुवारी २४ मे रोजी आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. २१ दिवसांत सहा मनोरुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सहाही मृत्यू हे मेडिकलमध्येच उपचारादरम्यान झाल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.
जीवन मंगुलाल केवलानी (५४) रा. नागपूर असे मृत मनोरुग्णाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन हे मनोरुग्णालयाचे रुग्ण होते. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. आठवडाभरापूर्वी त्यांच्यामध्ये ‘गॅस्ट्रो’ची लक्षणे दिसून आली सोबतच मानसिक स्थितीही ढासळली. नातेवाईकांनी त्यांना २१ मे रोजी पुन्हा मनोरुग्णालयात उपचारासाठी आणून भरती केले. त्यांच्यावर डॉक्टरांनी एक दिवस उपचार केला. बुधवार २३ मे रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये दाखल केले. त्यानंतर मेडिकलमध्ये त्यांच्या विविध तपासण्या झाल्या. या तपासण्यामध्ये त्यांचे यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच गुरुवार २४ मे रोजी दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाला.
जीवन यांच्या मृत्यूसह २१ दिवसांत सहा मनोरुग्णांचा मृत्यू एकट्या मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झाला आहे. मनोरुग्णांच्या मृत्यूची मालिका सुरूच असून, थांबण्याचे नाव घेत नसल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे. काहीजण मनोरुग्णालयाच्या कारभारावर तर काही मेडिकलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत आहे. मनोरुग्णांकडे काय लक्ष द्यायचे, याच भावनेतून उपचार होत असल्याने मृत्यूची मालिका सुरू असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू
जानेवारी ते फेबु्रवारी २०१८ या दोन महिन्यातच सात मनोरुग्णांचा, तर पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिन्यात एकूण सहा मनोरुग्णांचा मृत्यू झाल्याने मनोरुग्ण व कर्मचारी मिळून एकूण १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे हे सत्र थांबणार कधी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या आहेत समस्या
- मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यावर ही माहिती समोर आली, रुग्णालयात भोजनाचा दर्जा योग्य असला तरी औषधांचा तुटवडा आहे. हाफकिन्स कंपनीला औषधांची जबाबदारी दिल्यापासून औषधांची समस्या निर्माण झाली आहे.
- मेडिकलमधून एक दिवसाआड तीन डॉक्टरांची चमू मनोरुग्णालयात येऊन भरती रुग्णांची तपासणी करतात. परंतु चमूकडून योग्य पद्धतीने तपासणी होत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे रुग्णाला वेळीच औषधोपचार मिळत नाही.
- रिक्त जागा भरण्यात आल्या नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. यामुळे त्यांचे प्रत्येक रुग्णावर लक्ष राहत नाही. दुसरीकडे ते स्वत:च्या समस्याही डॉक्टरांना सांगत नसल्याने त्यांच्या जीवावरही बेतत आहे.