कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न प्रशासनाची भूमिका संशयास्पद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 10:36 PM2017-11-11T22:36:15+5:302017-11-11T22:36:25+5:30
मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नागपूर - येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कारागृहातील अनागोंदी कारभार बाहेर येऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाने तब्बल २४ तास हे गंभीर प्रकरण दाबून ठेवले. पत्रकारांना कुणकुण लागल्यानंतर या प्रकरणाची तक्रार कारागृह प्रशासनाने पोलिसांकडे नोंदविली, हे विशेष!
कळमन्यातील रहिवासी असलेला अमित रामाजी बुधवावरे याने काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केली होती. कोर्टाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला कारागृहात डांबण्यात आले. सध्या तो मध्यवर्ती कारागृहातील छोटी गोल बरॅक क्रमांक १ मध्ये आहे. कारागृहातील अधिकाºयांच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक अट्टल गुन्हेगार ऐषोआरामात जगत असून, ते अन्य कैद्यांवर भाईगिरी करतात. त्यांना टोचून बोलणे, मारहाण करणे, त्यांच्याकडून कामे करवून घेणे, असेही प्रकार येथे सुरू असल्याची ओरड आहे.
अट्टल गुन्हेगारांकडून अनेक कैद्यांचा छळ सुरू आहे. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार करूनही त्याचा फायदा होत नाही. उलट अधिकाºयांकडे तक्रार केल्याचे संबंधित कैद्यांना कळते. त्यामुळे ते त्या कैद्यांना जास्तच त्रास देतात. परिणामी अनेक कैदी प्रचंड दहशतीत आहेत. दहशतीत असलेल्या कैद्यांपैकी अमित बुधवावरे हा देखील एक कैदी आहे. त्याने त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास दोन दुपट्टे आणि चादर एकमेकांना बांधून पाण्याच्या टाकीवर चढला. एक टोक वरच्या बासाला बांधले तर दुस-या टोकाचा गळफास करून त्याने आपल्या गळ्यात घालून घेतला. नेमक्या वेळी सुरक्षा रक्षकाला हा प्रकार दिसल्याने त्याने आरडाओरड करून अन्य कैद्यांना जागविले आणि वरून उडी घेण्यापूर्वीच अमितला ताब्यात घेतले.
या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाºयांना लगेच या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच पोलिसांना कळविण्याऐवजी या प्रकरणाची बाहेर माहिती गेली तर खबरदार, असा धमकीवजा इशारा अन्य अधिकारी-कर्मचाºयांना दिल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत या प्रकरणाची कुणालाच माहिती नव्हती.
अचानक पत्रकारांना या गंभीर प्रकाराची कुणकुण लागल्याने कारागृह अधिकाºयांचे धाबे दणाणले. त्यांनी शुक्रवारी रात्री धंतोली पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर प्रशासनातर्फे तुरुंगाधिकारी विठ्ठल दत्तात्रय शिंदे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक वाघाडे यांनी या प्रकरणी कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कशासाठी ?
दोन महिन्यांपूर्वी या कारागृहात सूरज कोटनाके नामक गुन्हेगाराने आयुष पुगलिया नामक गुन्हेगाराची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर कारागृहातील अधिकाºयांमधील गटबाजी आणि येथील अनागोंदी कारभार चर्चेला आला होता. वरिष्ठ अधिकाºयांकडे त्याची माहितीही पत्रकारांनी सांगितली होती. मात्र, वरिष्ठांनी त्याची दखलच घेतली नाही. त्यामुळे येथील कारागृह अधिकारी अधिकच निर्ढावले असून, तीन वर्षांपूर्वी झालेली जेल ब्रेक किंवा तशीच दुसरी गंभीर घटना पुन्हा या कारागृहात होऊ शकते, अशी भीती वर्तविली जात आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने ही गंभीर घटना कोणत्या कारणामुळे दडपण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना माहिती कळविण्यासाठी तब्बल २४ तासाचा अवधी का लागला, हे कळायला मार्ग नाही. या संबंधाने कारागृहातील अधिका-यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.