पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 10:05 AM2021-12-29T10:05:47+5:302021-12-29T10:23:11+5:30
पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर : कोविडच्या प्रकोपामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी आल्याने मुदत संपत असलेल्या नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश नगरविकास मंत्रालयाने जारी केला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेचा कार्यकाळ येत्या १२ फेब्रुवारीला तर काटोल, उमरेड, कळमेश्वर-ब्राम्हणी, खापा, मोहपा, नरखेड, रामटेक व सावनेर नगरपरिषदेचा कार्यकाल ८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे कार्यकाल संपल्याच्या तारखेपासून संबंधित उपविभागीय अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहतील. यापूर्वीच मुदत संपल्यामुळे वाडी व मोवाड या नगरपरिषदेवर तर भिवापूर नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही-लोणवाही, बल्लारपूर, वरोरा, मुल, राजोरा, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या नगरपरिषदांचा कार्यकाल संपताच प्रशासक सूत्रे स्वीकारतील.
वर्धेतील ६ नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त
- वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिगंणघाट, आर्वी, देवळी, पुलगांव व सिंदीरेल्वे या सहा नगरपरिषदांचा कार्यकाळ २६ डिसेंबरलाच संपला आहे. त्यामुळे या सहाही नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरपरिषद - मुदत
कामठी - १२ फेब्रुवारी
काटोल - ८ फेब्रुवारी
उमरेड - ८ फेब्रुवारी
कमळमेश्वर - ८ फेब्रुवारी
खापा - ८ फेब्रुवारी
मोहपा - ८ फेब्रुवारी
नरखेड - ८ फेब्रुवारी
रामटेक - ८ फेब्रुवारी
सावनेर - ८ फेब्रुवारी
भंडारा - ६ फेब्रुवारी
तुमसर - ७ फेब्रुवारी
पवनी - १५ जानेवारी
साकोली - १५ जानेवारी
गोंदिया - ९ फेब्रुवारी
तिरोडा - ९ फेब्रुवारी
सिंदेवाही - २६ डिसेंबर
बल्लारपूर - १ जानेवारी
वरोरा - ३० डिसेंबर
मुल - ३० डिसेंबर
राजुरा - ३० डिसेंबर
गडचिरोली - १८ जानेवारी
देसाईगंज - १६ जानेवारी