नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:09 PM2020-10-02T22:09:00+5:302020-10-02T22:11:32+5:30
Gram panchayats,Administrators,Nagpur News जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १३० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १३० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. दरम्यान, सुरुवातीला राज्य शासनाने निर्णय घेत पालकमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून जि.प.च्या सीईओंनी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. सत्ताधाऱ्यांनी तर प्रशासक होऊ इच्छिणाऱ्यांची यादीही तयार केली होती. परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेण्यात आले. हे प्रकरण न्यायालयातही गेले. उच्च न्यायालयाने या प्रकरणात खासगी व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यास मनाई केली व सरकारी व्यक्तीची नियुक्तीचे आदेश सीईओेंना दिले. त्यानुसार एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या हिंगणा तालुक्यातील सातगाव वेना या ग्रा.पं.वर प्रशासक म्हणून आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तर ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील २९ व सप्टेंबरमध्ये १०० ग्रामपंचायतींची मुदत संपली. येथेही प्रशासक म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने तिथे प्रशासक म्हणून नियुक्तीसंदर्भात सुरुवातीला स्पष्ट सूचना नव्हत्या. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार व सीईओंच्या मार्गदर्शनात कृषी, पंचायत सांख्यिकी, आरोग्य आदी विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकार, पंचायत विभाग, जि.प.