कौतुकास्पद; वाकडे हातपाय, व्यंगत्व दूर करत दिली आयुष्याला उमेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 07:30 AM2021-10-03T07:30:00+5:302021-10-03T07:30:02+5:30
Nagpur News निराश जीवांच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरण्याचे कार्य नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान करीत आहे. या संस्थेने दुर्गम व गावखेड्यातील ३५०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे अपंगत्व दूर केले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : जन्मत: पाय वाकडे असलेल्या लहान मुलांना नीट चालता येत नाही, तर हात वाकडे असलेल्या मुलांना साधी वस्तूही पकडता येत नाही. जेवणासाठीसुद्धा दुसऱ्यावर विसंबून रहावे लागते. अशा निराश जीवांच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरण्याचे कार्य नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान करीत आहे. या संस्थेने दुर्गम व गावखेड्यातील ३५०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे अपंगत्व दूर केले आहे. अपंगत्वामुळे हरविलेला आत्मश्विास त्यांना पुन्हा मिळवून दिला आहे. (Admirable; The crooked limbs, the disfigurement gave life hope)
मागासलेल्या व दुर्गम भागातील लहान मुलांमध्ये ही नवी ऊर्जा पेरण्याचे काम ही संस्था सलग १५ वर्षांपासून करीत आहे. गरीब व गरजू मुले जी न्यूरॉलॉजीकल कमकुवत व अस्थिव्यंगाच्या व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया, औषधोपचार व फिजिओथेरपी देऊन त्यांचे अपंगत्व दूर करणे व त्यांनी कोणावरही अवलंबून न राहता इतर सामान्य मुलांसारखे जीवन जगण्यासाठी समर्थ करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या कार्याची सुरूवात २००६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून झाली. त्यानंतर या कार्याची व्याप्ती महाराष्ट्रातील भंडारा, अमरावती, गोंदिया व नागपूर जिल्ह्यापर्यंत वाढविण्यात आली. आता या सेवाकार्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, छत्तीसगड व ओडिशा या राज्यातील गरजू लोकापर्यंत वाढविण्यात आला आहे.
-मुलांमधील हातपायाचा व्यंगापासून ते मानेचा तिरळेपणावर शस्त्रक्रिया
या संस्थेचे संचालक व लहान मुलांचे आर्थाेपेडीक सर्जन डॉ. विरज शिंगाडे म्हणाले, दुर्गम व गावखेड्यामधील सेरेब्रल पाल्सी व गतिमंद, क्लब फूट, कमी उंची, जळल्यामुळे आलेले हातपायाचे व्यंग, पाचपेक्षा जास्त बोटे, जन्मत: असलेले अस्थिव्यंग, हाडांचे इन्फेक्शन, मानेचा तिरळेपणा, हात पाय वाकडे, लहान हातपाय लहान, लंगडत चालणे, हिप जॉइंटचे डिसलोकेशन आदी आजारांच्या मुलांवर संस्थेच्यावतीने मोफत परंतु कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
-मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची मदत
डॉ. शिंगाडे म्हणाले, शस्त्रक्रियेची गरज असलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी नागपुरातील ‘चिल्ड्रेन आर्थाेपेडीक केअर इन्स्टिट्यूट’चे एक पथक दुर्गम भागातील शाळांना भेटी देते. शिक्षकांच्या मदतीने शिबिर घेऊन मुलांची तपासणी करतात. ज्या मुलांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशा मुलांना नागपुरातील ‘चिल्ड्रेन आर्थाेपेडीक केअर इन्स्टिट्यूट’मध्ये आणून शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यांच्यासोबत येणाऱ्या पालकांची राहण्याची सोय व जेवणाचा खर्चही नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने केला जातो.
-१५ वर्षांपासून अखंडित सेवा
दानदात्यांच्या माध्यमातून हे सेवाकार्य गेल्या १५ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. कोरोनामुळे मागील वर्षी यात खंड पडला होता. परंतु आता पुन्हा ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्याने या उपक्रमाचे पुन्हा नियोजन केले जात आहे. उत्तमराव शिंगाडे व रत्नादेवी शिगांडे यांंच्या कल्पनेतील या सेवाकार्याला वास्तविकतेचे स्वरुप डॉ. विरज शिंगाडे यांनी दिले आहे.