कोविड काळातही सर्जन्सकडून कौतुकास्पद कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:09 AM2021-02-17T04:09:54+5:302021-02-17T04:09:54+5:30

नागपूर : कोरोनाच्या आणीबाणीच्या काळातही मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील शल्यचिकित्सकांनी (सर्जन्स) कौतुकास्पद कामगिरी करीत तब्बल ९५५ शस्त्रक्रिया केल्या. यात ...

Admirable performance from surgeons even in the Covid period | कोविड काळातही सर्जन्सकडून कौतुकास्पद कामगिरी

कोविड काळातही सर्जन्सकडून कौतुकास्पद कामगिरी

Next

नागपूर : कोरोनाच्या आणीबाणीच्या काळातही मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील शल्यचिकित्सकांनी (सर्जन्स) कौतुकास्पद कामगिरी करीत तब्बल ९५५ शस्त्रक्रिया केल्या. यात सर्वाधिक शस्त्रक्रिया अस्थिरोग शल्यचिकित्सकांनी केल्या. ३६४ शस्त्रक्रिया करून जखमी रुग्णांना मदतीचा हात दिला. याशिवाय, न्युरोसर्जरीच्या शल्यचिकित्सकांनी ३२४, जनरल सर्जरीच्या शल्यचिकित्सकांनी १६५, प्लास्टिक सर्जरीच्या शल्यचिकित्सकांनी ५८, डेंटल सर्जन्सनी २७, सिव्हीटीएसच्या शल्यचिकित्सकांनी १४, तर ईएनटीच्या शल्यचिकित्सकांनी ३ शस्त्रक्रिया केल्या.

नागपूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाला मार्च महिन्यापासून सुरूवात झाली. हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. परिणामी, मेडिकलचे चित्रही बदलत गेले. रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरलेले ट्रॉमा केअर सेंटर कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करण्यात आले. ‘ट्रॉमा’ला मेडिकलच्या एका वॉर्डात स्थानांतरित केले. कोविडच्या भीतीने येथील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्याही रोडावली. शिवाय, वैद्यकीय शिक्षण विभागानेही कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केवळ गंभीर रुग्णांनाच भरती करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. परंतु विदर्भच नाही, तर शेजारच्या चार राज्यांचा भार असलेल्या मेडिकलमध्ये गंभीर रुग्णांची संख्या तेवढीच होती. त्याही स्थितीत जिवाचा धोका पत्करून मेडिकलच्या विविध विषयातील शल्यकित्सकांनी आपली कामगिरी चोख बजावत जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करीत अपघातातील जखमींना जीवनदान दिले.

- रुग्णसंख्या ४० टक्क्याने, मात्र शस्त्रक्रिया २१ टक्केच घटल्या

ट्रॉमा केअर सेंटरमध्ये २०१९ या वर्षात ४१६१ रुग्ण भरती झाले होते. यातील ८३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १२१८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. २०२० मध्ये २४९८ रुग्ण भरती झाले. यातील २७६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ९५५ शस्त्रक्रिया झाल्या. एकूणच २०१९च्या तुलनेत मागील वर्षी ४० टक्क्याने रुग्णसंख्या घटली असली तरी, शस्त्रक्रियेत २१ टक्क्यानेच घट आली.

- मृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश ()

कोविड प्रादुर्भावात रस्ता अपघातासह इतरही अपघातांचे प्रमाण कमी झाले असले तरी, गंभीर स्थितीत येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले नव्हते. कोरोनाचा धोका असतानाही आवश्यक खबरदारी घेत अनेकांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामुळे १०१९ मध्ये ८३८, तर, २०२० मध्ये २७६ जखमी रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमी झालेला हा मृत्यू दर सर्वच शल्यचिकित्सकांच्या प्रयत्नांना आलेले यश आहे.

- डॉ. मोहम्मद फैजल

प्रभारी अधिकारी, ट्रॉमा केअर सेंटर

- दोन वर्षातील तुलनात्मक शस्त्रक्रिया

२०१९ २०२०

जानेवारी ७१ १६०

फेब्रुवारी ८० १८४

मार्च ९९ १२६

एप्रिल १०३ ३४

मे ८९ ५६

जून ८६ ५७

जुलै ९९ ७३

ऑगस्ट ९८ ३९

सप्टेंबर ७७ ३८

ऑक्टोबर १०६ ५७

नोव्हेंबर १२२ ६२

डिसेंबर १८८ ६९

२०१९ : ४१६१ अ‍ॅडमिशन : ८३८ मृत्यू : १२१८ शस्त्रक्रिया

२०२० : २४९८ अ‍ॅडमिशन : २७६ मृत्यू : ९५५ शस्त्रक्रिया

Web Title: Admirable performance from surgeons even in the Covid period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.