एम्सच्या १०० जागांवरच प्रवेश : संचालकांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:50 AM2019-02-27T00:50:30+5:302019-02-27T00:51:51+5:30
मिहानमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इमारतीच्या बांधकामाची गती वाढविण्यात आली आहे. यामुळे मे किंवा जून महिन्यापर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू होईल व पुढील वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशही दिला जाईल, अशी ग्वाही ‘एम्स’च्या संचालक डॉ. विभा दत्ता यांनी देत, प्रवेशाच्या जागेला घेऊन तयार झालेल्या संभ्रमालाच दूर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इमारतीच्या बांधकामाची गती वाढविण्यात आली आहे. यामुळे मे किंवा जून महिन्यापर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू होईल व पुढील वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशही दिला जाईल, अशी ग्वाही ‘एम्स’च्या संचालक डॉ. विभा दत्ता यांनी देत, प्रवेशाच्या जागेला घेऊन तयार झालेल्या संभ्रमालाच दूर केले.
मिहानमधील २०० एकर परिसरात ‘एम्स’चे बांधकाम होत आहे. स्वत:ची इमारत नसल्याने ‘एम्स’ एमबीबीएसचे वर्ग मेडिकल कॉलेजमध्ये सप्टेंबर २०१८ पासून सुरू झाले. पहिले वर्ष व अपुऱ्या जागेमुळे एमबीबीएसच्या ५० जागेवरच प्रवेश देण्यात आले. मात्र रविवारी ‘एम्स’ नवी दिल्लीने नागपूरसाठी चालू वर्षात १०० जागांवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे ‘प्रॉस्पेक्ट्स’ काढल्याने गोंधळ उडाला. याबाबत डॉ. विभा दत्ता यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘प्रॉस्पेक्टस’वर नागपूर ‘एम्स’साठी १०० जागेवर प्रवेश देण्यात येईल, असे नमूद आहे. परंतु यात ३१ मेपर्यंत या वाढीव जागांवर विचारही केला जाईल, असेही म्हटले आहे. आता आम्ही ठरविले की, ५० विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. येत्या शैक्षणिक वर्षांत एमबीबीएसच्या संपूर्ण १०० जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मंत्रालयस्तरावरही देण्यात आली आहे.
डिसेंबर २०१९ पर्यंत मिहानमध्ये स्थानांतर
‘एम्स’चे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) मिहानमध्ये मे किंवा जून महिन्यापर्यंत सुरू होईल. यादरम्यान जेवढ्याही एक व दोन मजल्याच्या इमारती आहेत आणि निवासी गाळे आहेत त्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डिसेंबर २०१९ पर्यंत आम्ही मेडिकलमधून मिहानमध्ये आपल्या इमारतीत स्थानांतरित होणार, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.
सप्टेंबर २०२०पर्यंत बांधकाम पूर्ण
मिहानमध्ये एम्सचे बांधकाम विविध टप्प्यात सुरू आहे. बांधकाम वेगाने सुरू आहे. यानुसार दिलेल्या कालावधीत म्हणजे सप्टेंबर २०२०पर्यंत बांधकाम पूर्ण हाईल. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या संपूर्ण जागेवर प्रवेश देण्यात अडचणी येणार नाहीत. तसेही प्रत्येक मेडिकल कॉलेजच्या सुरूवातीच्या काही वर्षात समस्या येतात, परंतु त्या सोडविण्यास आम्ही सक्षम आहोत, असे ही डॉ. दत्ता यांनी स्पष्ट केले.