सीबीएसईची मान्यता नसताना विद्यार्थ्यांना दिले प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:38+5:302021-09-10T04:13:38+5:30
रामटेक : रामटेक शहरालगत शीतलवाडी ग्रामपंचायतअंतर्गत मौजा परसोडा येथे साई इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या शाळेला केंद्रीय ...
रामटेक : रामटेक शहरालगत शीतलवाडी ग्रामपंचायतअंतर्गत मौजा परसोडा येथे साई इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या शाळेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)ची मान्यता नसताना २०१८ पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. याबाबत संस्था चालकांनी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केली. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या ३९७ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
मौदा येथील साई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतअंतर्गत परसोडा येथे साई इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संचालित केले जाते. ही शाळा सीबीएसई संलग्न असल्याचे सांगण्यात आले. मात्र या शाळेला सीबीएसईद्वारे अद्याप तरी संलग्नता देण्यात आलेली नाही. असे असताना गत तीन वर्षांपासून शाळेच्या फलकावर सीबीएसई संलग्नता दाखवून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केली आहे. सीबीएसई शाळेच्या नावावर विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रवेश शुल्क व ट्युशन फी घेतली. शिक्षण विभागानेही याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येते.
रामटेकच्या या शाळेत आजमितीला नर्सरी ते आठव्या वर्गापर्यंत ३९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही पालकांनी या शाळेबाबत माहिती घेतली असता, ही शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत संस्थेचे सचिव विठ्ठल नागपुरे यांना विचारणा केली असता, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता नसल्याचे मान्य केले. ९ सप्टेंबर २०२१ रोजी काही पालक, शाळा संचालक, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने, जि.प. सदस्य सतीश डोंगरे यांच्या उपस्थितीत साई इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे उपरोक्त प्रकरणी चर्चा करण्यात आली. मात्र कुठलाच तोडगा निघाला नाही.
सीबीएसई मान्यता नसल्याने आठव्या वर्गात शिकत असलेल्या १५ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी असल्याचे उपस्थित पालकांनी सांगितले. या शाळेत नियुक्त शिक्षक हे आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नसल्याचा आरोपही पालकांनी यावेळी केला. विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्याबद्दल संस्थाचालकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी पालकांनी गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांच्याकडे केली आहे. या शाळेला २०१८ साली शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी परवानगी दिली होती. मात्र या परवानगी आदेशातील अटी व शर्ती शाळा संचालकांनी पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे सीबीएसईची मान्यता प्राप्त झाली नाही.
---
उपरोक्त प्रकरणी चौकशी करून सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याकडे पाठविणार आहे. फौजदारी कारवाईसंदर्भात त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. वरिष्ठांकडून आदेश आले तर संस्था चालकाविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात येईल.
संगीता तभाने, गटशिक्षणाधिकारी, रामटेक