पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ५ डिसेंबरपासून प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:18+5:302020-12-03T04:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर निघाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर निघाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ५ डिसेंबरपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने एमएस्सी, एमकॉम, एलएलएम, एमसीएम, एमसीटी, एम.हॉस्प, एमआयआरपीएम या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांत याच माध्यमातून प्रवेश होतील.
विद्यार्थ्यांना ५ ते १२ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. तर २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिल्या फेरीतील पसंतीक्रम २१ ते २२ डिसेंबर या कालावधीत सादर करता येतील. दुसऱ्या फेरीतील पसंतीक्रम ३० डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत भरता येतील. १४ जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात होणार आहे. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सखोल माहिती देण्यात आली आहे.
प्रवेशाचा दुसरा टप्पा कधी ?
पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमांमध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी, एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व ‘एमआयआरपीएम’ (मास्टर ऑफ इंडस्ट्रीअल रिलेशन्स अॅन्ड पर्सनल मॅनेजमेंट) यांचा समावेश आहे. मात्र ‘एमए’, ‘एमएफए’ यासारख्या अभ्यासक्रमांचा यात समावेश नाही. यांची प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात राबविणार का आणि त्याचे वेळापत्रक कधी घोषित करणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.
पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे ५ ते १२ डिसेंबर (सायं ५)
तात्पुरती गुणवत्ता यादी १६ डिसेंबर
आक्षेप १६ ते १८ डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी २० डिसेंबर (३ वाजता)
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम २१ ते २२ डिसेंबर
जागांची वाटपयादी २५ डिसेंबर (३ वाजता)
महाविद्यालयांत रिपोर्टिंंग २६ ते ३० डिसेंबर
पहिल्या यादीतील रिक्त जागा ३० डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम ३० डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ (सायं ५)
जागांची वाटपयादी ३ जानेवारी (३ वाजता)
महाविद्यालयांत रिपोर्टिंंग ४ ते ८ जानेवारी २०२१
शैक्षणिक वर्गांना सुरुवात १४ जानेवारी २०२१