‘अदूर यांच्या चित्रपटात देशातील राजकारण व सामाजिक भीषणतेचे प्रतिबिंब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 10:56 PM2023-06-01T22:56:46+5:302023-06-01T23:03:50+5:30
Nagpur News राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक संस्थांचे प्रतिबिंब म्हणजे चित्रपट असून, अदूर यांच्या माहितीपटातून, चित्रपटांमधून आणि जीवनातूनदेखील याचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी केले.
नागपूर : चित्रपट निर्माते म्हणून अदूर यांनी प्रतिमा आणि प्रतिबिंबांद्वारे देशातील राजकारण, सामाजिक परिस्थितीच्या भीषणतेचे वास्तव दर्शविले आहे. राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक संस्थांचे प्रतिबिंब म्हणजे चित्रपट असून, अदूर यांच्या माहितीपटातून, चित्रपटांमधून आणि जीवनातूनदेखील याचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी केले.
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, स्पिक मॅके व इनक्रेडिबल इंडियाच्या संयुक्त विद्यमाने विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात व्हिएनआयटी नागपूर येथे सुरु असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री गिरीश कासारवल्ली दिग्दर्शित पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्यावरील 'इमेजेस/रिफ्लेक्शन्स' या माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी कासारवल्ली यांनी गोपालकृष्णन यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची ओळख करून दिली. चित्रपट दिग्दर्शक गोपालकृष्णन यांचा प्रवास या माहितीपटात मांडण्यात आला आहे.
अदूर यांच्या जीवनावर त्यांची कौटुंबिक परिस्थिती, केरळमधील सांस्कृतिक आणि राजकीय वास्तव, त्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचे दिवस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाचा पडलेला प्रभाव या माहितीपटाच्या शेवटच्या भागात झळकला आहे. स्क्रीनिंगनंतर अदूर गोपालकृष्णन आणि गिरीश कासारवल्ली या दोन्ही लिविंग लिजेंड्सनी उपस्थितांशी संवाद साधला. संस्कृती आणि कला या गोष्टी माझ्या जीवनातील बालपणापासूनचे भाग होते. माझ्या सर्व चित्रपटात देशातील सर्व कलांचे, वास्तवाचे, संस्कृतीचे दर्शन घडते. आपली मुळं आपल्याला ओळखता यायला हवीत, असे मत अदूर यांनी मांडले. मिनू शंकर यांनी सूत्रसंचालन केले.
चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट- अडूर गोपालकृष्णन
अडूर गोपालकृष्णन यांना १६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १७ केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले असून, दादासाहेब फाळके पुरस्कारासह ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. ३७ पेक्षा जास्त चित्रपट, माहितीपट आणि फिचर फिल्म्स त्यांच्या नावावर असून, विस्कॉन्सिन-मिलवॉकी विद्यापीठाने त्यांच्या पेक स्कूल ऑफ आर्ट्समध्ये अदूर गोपालकृष्णन फिल्म आर्काइव्ह अँड रिसर्च सेंटर नावाचे संग्रहण आणि संशोधन केंद्र स्थापन केले आहे.
पॅरलल सिनेमाचे जनक -गिरीश कासारवल्ली
पॅरलल सिनेमाचे जनक गिरीश कासारवल्ली यांच्या नावावर १४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असून, अगणित आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान प्राप्त आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले आहे.