शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून सेवाव्रत स्वीकारा : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 09:52 PM2018-06-30T21:52:41+5:302018-06-30T21:53:48+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे ते आदर्श उदाहरण होय, या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा आदर्श राजाचे अनुकरण करून आयुष्यात सेवाव्रत स्वीकारा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

Adopt Shivaji Maharaj's ideals: Nitin Gadkari | शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून सेवाव्रत स्वीकारा : नितीन गडकरी

शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून सेवाव्रत स्वीकारा : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देयशोधरा नगरातील शिवाजी चौकात छत्रपतींच्या पूर्णाकृती म्युरलचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे ते आदर्श उदाहरण होय, या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा आदर्श राजाचे अनुकरण करून आयुष्यात सेवाव्रत स्वीकारा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
महापालिकेतर्फे यशोधरा नगर येथील शिवाजी चौकात तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती म्युरल प्रतिमेचे लोकार्पण गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होेते. व्यासपीठावर आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, सर्व धर्माचा सन्मान करणे, जात, धर्म, पंथ याही पलिकडे जाऊन विचार करणे, ही आमची संस्कृती आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही केंद्रात आणि राज्यात काम करीत आहोत. नागपूरच्या भविष्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प हाती घेतला असून शहराचा वेगाने कायापालट होत आहे. सोबतच या भागातील हजारो लोकांना उपचार करण्यात आले. देशभरातील १० कोटी महिलांना गॅस कनेक्शन दिले असून यात नागपुरातील १ लाख २० हजार महिलांचा समावेश आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराचा चौफेर विकास होत आहे. गरिबांना अन्न व निवारा मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. यातूनच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनवरील धान्य वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यक्रमाला बसपाचे पक्षनेते मो. जमाल, नगरसेवक दयाशंकर तिवारी, संदीप जाधव, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, निरंजना पाटील, नसीम बानो इब्राहिम खान, प्रमिला मंथरानी, नगरसेवक शेषराव गोतमारे, संजय चावरे, परसराम मानवटकर, डॉ. विकी रुघवानी, भाजपचे महामंत्री गणेश कानतोडे, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, दिलीप गौर, माजी नगरसेवक प्रभाकर येवले, झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला शिवस्मारक उत्सव समितीने सहकार्य केले. प्रास्ताविक भाजपचे महामंत्री गणेश कानतोडे यांनी केले. संचालन महेश संगेवार यांनी केले. आभार नंदू कावळे यांनी मानले.

वर्धा, भंडारापर्यंत ब्रॉडगेज मेट्रो
नागपूर लगतची शहरे मेट्रोने जोडण्याचा मानस असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी म्हटले. लवकरच नागपूर-वर्धा, नागपूर-भंडारा, रामटेक-काटोल ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव आहे. वर्धा-नागपूर एसी मेट्रोमध्ये केवळ अर्धा तासात कापणे भविष्यात शक्य होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

गरिबांना फर्निचरयुक्त घरे
नागपूर जिल्ह्यातील गरिबांना पंतप्रधान आवास योजनेतून ५० हजार घरे देण्याचा संकल्प आहे. त्यापैकी आठ हजार घरांचे काम सुरू आहे. या घरांमध्ये डबल बेड, सोफासेट राहणार असून सोलर हिटर आणि मोफत वीज देण्याचे प्रस्तावित असून केवळ साडेतीन ते चार लाख रुपयांत ही घरे उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

प्रदूषणमुक्त, प्लास्टिकमुक्त नागपूर
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपुरातील प्रत्येक व्यक्ती स्मार्ट व्हायला हवा. अर्थातच प्लास्टिकबंदी, शून्य प्रदूषण करायचे असेल तर आता प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत योगदान द्यायला हवे. कचरा कचरापेटीतच टाका. प्लास्टिक वापरू नका, असे अवाहन गडकरी यांनी केले.

जरीपटका पुलासाठी ६५ कोटी
देशात रस्ते बांधत असताना शहर विकासासाठी निधी देत आहे. पुन्हा ७०० कोटी आणल्याचा उल्लेख करीत जरिपटका पुलासाठी ६५ कोटी मंजूर केल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

 

Web Title: Adopt Shivaji Maharaj's ideals: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.