प्रौढ मतिमंद, दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कायदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:41 PM2018-09-26T23:41:39+5:302018-09-26T23:44:42+5:30
१२३ अंध, मतिमंद, दिव्यांग व बेवारस मुलामुलींचे पालकत्त्व स्वीकारून त्यांच्या आजीवन पुनर्वसनासाठी झटणाऱ्या वझरच्या शंकरबाबा पापळकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. संत गाडगेबाबांनी दिलेली घोंगडी खांद्यावर घेत, सर्वांना प्रेमभावाने अभिवादन करीत कपड्यांचीही तमा न बाळगता केवळ कामात रमणाऱ्या या अवलियाला मुलाखतीचा शिष्टाचार कसा कळणार ? मुलाखतकारांनी एक प्रश्न विचारल्यावर दुसऱ्या प्रश्नाची वाट न पाहता भावविभोर झालेल्या बाबांनी भडाभडा मनातील भावना बोलल्या. सत्काराने मी आनंदी आहे. मात्र अशा कार्यक्रमातून माणसे घडली पाहिजेत. अनाथ बालकांना १८ वर्षानंतर संस्थांमध्ये ठेवता येत नाही. मग ही मतिमंद, अंध, अनाथ मुले कुठे जातील? त्यामुळे १८ वर्षावरील अनाथांच्या आजीवन पुनर्वसनाचा कायदा सरकारने करावा, यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनिक साद घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १२३ अंध, मतिमंद, दिव्यांग व बेवारस मुलामुलींचे पालकत्त्व स्वीकारून त्यांच्या आजीवन पुनर्वसनासाठी झटणाऱ्या वझरच्या शंकरबाबा पापळकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. संत गाडगेबाबांनी दिलेली घोंगडी खांद्यावर घेत, सर्वांना प्रेमभावाने अभिवादन करीत कपड्यांचीही तमा न बाळगता केवळ कामात रमणाऱ्या या अवलियाला मुलाखतीचा शिष्टाचार कसा कळणार ? मुलाखतकारांनी एक प्रश्न विचारल्यावर दुसऱ्या प्रश्नाची वाट न पाहता भावविभोर झालेल्या बाबांनी भडाभडा मनातील भावना बोलल्या. सत्काराने मी आनंदी आहे. मात्र अशा कार्यक्रमातून माणसे घडली पाहिजेत. अनाथ बालकांना १८ वर्षानंतर संस्थांमध्ये ठेवता येत नाही. मग ही मतिमंद, अंध, अनाथ मुले कुठे जातील? त्यामुळे १८ वर्षावरील अनाथांच्या आजीवन पुनर्वसनाचा कायदा सरकारने करावा, यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनिक साद घातली.
ग्रामायण प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व विचारवंत मा. गो. वैद्य यांच्या हस्ते बुधवारी शंकरबाबा पापळकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शंकरबाबांनी आपल्या संस्थेचे कार्य पाहणारा मानसपुत्र विदुर याच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. मी धोब्याचा मुलगा. आईवडिलांसह मीही कपडे धुण्याचे काम केले, गरिबीत राहिलो. मतिमंद मुलांची व्यथा पाहून यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. या कार्यात बहुतेकांचे प्रेम मिळाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
देशात १८ वर्षावरील १ लाखाच्यावर अनाथ मुलेमुली अनाथालयातून बाहेर पडतात. ते पुढे कोणत्या अवस्थेत जगतात, याची जाणीव सरकारला व समाजाला नाही. त्यामुळे सरकारने आजीवन पुनर्वसनाचा कायदा करावा. यासाठी त्यांच्या व अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे एक लाख स्वाक्षऱ्यांची मोहीम राबविली होती. या स्वाक्षऱ्यांचे फार्म बाबांनी ग्रामायण प्रतिष्ठानकडे सोपविले. सरकार अशा मुलांसाठी योजना चालविते, कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. सरकारने अशा मुलांना आधार कार्ड, मतदानकार्ड द्यावा व त्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करावा, असे आवाहन त्यांनी केले. बाबांच्या मुलाखत मंजुषा व चंद्रकांत यांनी घेतली.
याप्रसंगी मंचावर मा.गो. वैद्य यांच्या पत्नी सुनंदा वैद्य, व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक श्रीकांत चेंडगे, आशुतोष देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात अनाथ, अंध, अपंग, मूकबधिर व मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या पाच संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जयश्री वटे व श्रीकांत गाडगे यांनी केले. प्रास्ताविक ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी केले. सचिव संजय सराफ यांनी आभार मानले.
शंकरबाबांसारख्यांमुळेच ‘मेरा देश महान’ : वैद्य
‘सौ मेसे ९९ बेईमान फिर भी मेरा देश महान’ असे उपहासाने म्हटले जाते. मात्र ज्या एक टक्क्यांमुळे हा देश महान आहे, त्यामध्ये शंकरबाबांसारखे लोक मोडतात, असे मनोगत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले. ते नेहमी प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. अशा योग्य माणसाचा सत्कार केल्याबद्दल ग्रामायण संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले. हा स्वत:च्या मृत्यूची तयारी करणारा व मृत्यूचेही स्वागत करणारा विलक्षण माणूस आहे. आपल्या देशाला मोठे करणारी अशी माणसे आहेत. त्यांची ओळख नाही, परिचय नाही, असे सांगत त्यांनी काही आठवणी नमूद केल्या. शंकरबाबांनी वझरच्या उजाड टेकडीवर झाडांची हिरवाई आणि अनाथ मुलांचे नंदनवन फुलविले आहे. त्यामुळे एकदातरी वझरला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.