केंद्राकडून मिळणार अॅडव्हान्स औषधे : राज्य कामगार विमा योजना आयुक्तांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:55 PM2019-01-08T23:55:35+5:302019-01-08T23:57:49+5:30
राज्य कामगार आयुक्तालयामार्फत नागपूर विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १७ सेवा दवाखान्यांमधील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार आहे. साधारण एक महिन्यात पुढील तीन महिन्यांची ‘अॅडव्हान्स’ औषधे उपलब्ध करून दिली जाईल, जिथे डॉक्टर नाहीत तिथे ‘बॉण्डेड’ डॉक्टरांची नियुक्ती करून रुग्णसेवा सुरळीत केली जाईल, सेवा दवाखान्यांचा दर्जा सुधारला जाईल, अशी ग्वाही राज्य कामगार विमा योजना आयुक्त ए.बी. धुळाज यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य कामगार आयुक्तालयामार्फत नागपूर विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १७ सेवा दवाखान्यांमधील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार आहे. साधारण एक महिन्यात पुढील तीन महिन्यांची ‘अॅडव्हान्स’ औषधे उपलब्ध करून दिली जाईल, जिथे डॉक्टर नाहीत तिथे ‘बॉण्डेड’ डॉक्टरांची नियुक्ती करून रुग्णसेवा सुरळीत केली जाईल, सेवा दवाखान्यांचा दर्जा सुधारला जाईल, अशी ग्वाही राज्य कामगार विमा योजना आयुक्त ए.बी. धुळाज यांनी दिली.
राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयाचे कामकाज, बांधकाम व सेवा दवाखान्यांचा आढावा आयुक्त धुळाज यांनी मंगळवारी घेतला. तब्बल पाच तास त्यांनी विविध विषयांवर बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्याची माहिती आहे.
साडे तीन कोटींच्या कामांना वेग देणार
‘लोकमत’शी बोलताना आयुक्त धुळाज म्हणाले, कामगार विमा रुग्णालयासह काही सेवा दवाखान्यांच्या संरक्षण भिंतीपासून ते नूतनीकरणाचे तब्बल साडे तीन कोटींची कामे सुरू आहेत. आज झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मार्च महिन्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
बंद झालेल्या सेवा दवाखान्यांचा प्रस्ताव
महाल, नंदनवन, रामबाग, गणेशपेठ आणि सोमवारीपेठ येथील पाच सेवा दवाखाने, तर अकोल्यातील एमआयडीसी आणि जुना अकोला येथील बंद पडलेल्या सेवा दवाखान्यांविषयी आयुक्त धुळाज यांनी माहिती घेतली. रुग्णसंख्या रोडवल्याने हे सेवा दवाखाने बंद पडल्याचे सांगण्यात आले. यावर त्यांनी यातील किती दवाखाने सुरू करता येईल, याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.
बॉण्डेड डॉक्टरांची भरती करणार
कामगार विमा रुग्णालयासह सेवा दवाखान्यांमधील डॉक्टरांची रिक्त पदे भरून काढण्यासाठी बॉण्डेड डॉक्टरांची भरती केली जाणार असल्याची माहिती आयुक्त धुळाज यांनी दिली. ते म्हणाले, कंत्राटी डॉक्टर तीन-तीन महिन्यांच्या सुट्यांवर जातात. यामुळे रुग्णसेवा अडचणीत येते. यावर उपाय म्हणून एक वर्षासाठी बॉण्डेड डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उशिरा येणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई
आयुक्त धुळाज नागपुरात असतानाही सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयातील काही कंत्राटपद्धतीवर असलेले ‘स्पेशालिस्ट डॉक्टर’ सकाळी १० वाजेनंतरच बाह्यरुग्ण विभागात पोहचले. याची माहिती स्वत: आयुक्तांनी घेतली. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांसोबतच ते उशिरा येत असतानाची माहिती दडवून ठेवणाऱ्या वरिष्ठांवरही आता कारवाई केली जाईल, असेही आयुक्त धुळाज यांनी सांगितले.