खासगी रुग्णालयांची उपचाराआधी ॲडव्हान्स वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:21 PM2021-04-08T23:21:31+5:302021-04-08T23:22:53+5:30
Private hospitals Advance recovery जिल्हाधिकारी ग्राहक कल्याण परिषदेच्या अशासकीय सदस्यांकडे काेराेना रुग्णांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच ॲडव्हान्स वसुली करणाऱ्या खासगी रुग्णालयांविराेधात अनेक तक्रारी प्राप्त हाेत आहेत. हा प्रकार म्हणजे ग्राहक नियमांचे सर्रास उल्लंघन असून खासगी रुग्णालये रुग्णांची पिळवणूक करीत असल्याचा आराेप सदस्यांनी केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी ग्राहक कल्याण परिषदेच्या अशासकीय सदस्यांकडे काेराेना रुग्णांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच ॲडव्हान्स वसुली करणाऱ्या खासगी रुग्णालयांविराेधात अनेक तक्रारी प्राप्त हाेत आहेत. हा प्रकार म्हणजे ग्राहक नियमांचे सर्रास उल्लंघन असून खासगी रुग्णालये रुग्णांची पिळवणूक करीत असल्याचा आराेप सदस्यांनी केला आहे.
अशासकीय सदस्य मो. शाहिद शरीफ यांनी सांगितले, ग्राहक अधिनियम १९८६ अंतर्गत उपचारापूर्वीच ॲडव्हान्स राशी वसूल करण्याचे कुठलेही प्रावधान नाही. त्यामुळे अशाप्रकारे ॲडव्हान्सच्या नावाने रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसा वसूल करणे अवैध असल्याची टीका त्यांनी केली. महामारीच्या काळात आधीच नागरिक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. देशात काेराेना महामारीने पुन्हा डाेके वर काढले आहे. यामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित आहे. नागपूरमध्येही लाॅकडाऊन करण्यात आले आहे. वाढत्या संसर्गामुळे रुग्णालये भरलेली आहेत. मात्र खासगी रुग्णालयांकडून याचाच फायदा घेत उपचार सुरू करण्यापूर्वीच वसुली केली जात असल्याने वेळेवर पैसा जमा करण्यासाठी लाेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिषदेकडे याबाबत अनेक तक्रारी दरराेज प्राप्त हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषधी विभाग कुठे आहे?
शाहिद शरीफ यांनी सांगितले, खासगी रुग्णालयातील उपचार खर्चाबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ऑडिटर नियुक्त केले आहेत. मात्र अनेक माेठ्या रुग्णालयांशी अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे दिसते आहे. यामुळे नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी खासगी रुग्णालयांकडून हाेत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. रुग्णांकडून रेमडेसिवीरसाठी रुग्णांकडून चार ते पाच हजार रुपये वसूल केले जातात. या परिस्थितीत अन्न व औषधी विभाग मुकदर्शकाप्रमाणे कुठे दिसेनासा झाला आहे. खरेतर यावेळी त्यांनी माेर्चा सांभाळून नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. नियमानुसार जीवनावश्यक औषधांना नियमित किमतीत रुग्णांना उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आराेप शरीफ यांनी केला.