संघाच्या विजयादशमी सोहळ्याला अडवाणी येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:34 AM2017-09-27T01:34:47+5:302017-09-27T01:35:01+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित राहणार आहेत. सद्यस्थितीत राजकीय परिघातून काहीसे बाहेर गेलेले अडवाणी बºयाच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संघाच्या विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा हा उत्सव ३० सप्टेंबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रविदास साधुसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. लालकृष्ण अडवाणीदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा अधिकृत दौराच निश्चित झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी ते दिल्लीहून रात्री ९.३० वाजता नागपूरला पोहोचतील. त्यानंतर वर्धमाननगर येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. सकाळी विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहून दुपारी १४.४० वाजता ते परत दिल्लीकडे रवाना होतील.
या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.
सरसंघचालकांची घेणार भेट
भाजपातर्फे मोदी यांची निवडणूक प्रचार प्रमुखपदी झालेल्या निवडीनंतर नाराज झालेल्या अडवाणींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ जुलै २०१३ रोजी त्यांनी नागपुरात येऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अडवाणी यांची ही पहिलीच नागपूर भेट ठरणार आहे. विजयादशमी उत्सवानंतर अडवाणी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.