‘अॅडव्हान्टेज विदर्भ’चा दुसराही मुहूर्त चुकला
By Admin | Published: August 3, 2014 12:52 AM2014-08-03T00:52:15+5:302014-08-03T00:52:15+5:30
विदर्भाच्या विकासाबाबत सरकार किती गंभीर आहे, याचा प्रत्यय ‘अॅडव्हान्टेज विदर्भ -२’च्या आयोजनावरून आला आहे. २ आॅगस्ट रोजी ही परिषद होईल, ही तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी
नागपूर : विदर्भाच्या विकासाबाबत सरकार किती गंभीर आहे, याचा प्रत्यय ‘अॅडव्हान्टेज विदर्भ -२’च्या आयोजनावरून आला आहे. २ आॅगस्ट रोजी ही परिषद होईल, ही तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केलेली घोषणाही फोल ठरली आहे. यापूर्वी ही परिषद फेब्रुवारीमध्ये होणार होती, हे येथे उल्लेखनीय. २० आॅगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, आता ही परिषद गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदर्भ विकासाच्या बाबतीत सरकार गंभीर आहे, हे या भागातील जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठीच खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने गतवर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात नागपुरात ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ही गुंतवणूकदारांची परिषद घेण्यात आली होती. दोन दिवसीय परिषदेत १४ हजार ५३४ कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले होते. गुंतवणूकदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘अॅडव्हान्टेज विदर्भ-२’ होणे अपेक्षित होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली; ही माहितीही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच नागपुरात दिली होती. निवडणुका झाल्यावर ही परिषद केव्हा होणार, याकडे उद्योगजगतासह वैदर्भीय जनतेचेही याकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे राणे यांच्या खात्याकडेच या परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी होती. काही दिवसांनी राणे यांनी पुन्हा सूत्रे स्वीकारल्यावर पुन्हा ‘अॅडव्हान्टेज विदर्भ -२’ची चर्चा सुरू झाली. तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर मोघे यांनी तारीख (२ आॅगस्ट) जाहीर केली होती. पण आता हा मुहूर्तही टळला आहे.
यासंदर्भात उद्योग सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असता, परिषदेबाबत शासनाकडून अधिकृतरीत्या अद्याप काहीच कळविण्यात आले नाही, असे सांगण्यात आले. सध्या राणे यांनी पुन्हा राजीनामा दिल्याने सध्या उद्योग खात्याला मंत्री नाही. दुसरीकडे २० आॅगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या परिषदेची व्याप्ती व करावी लागणारी तयारी लक्षात घेता त्यापूर्वी ती आयोजित करणे शक्य नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)