अ‍ॅडव्हेंचर टूर, तोही ६०० किलोमीटरचा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:27 AM2017-10-29T01:27:50+5:302017-10-29T01:28:02+5:30

आव्हाने हा जीवनाचा भाग आहे. मात्र आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आव्हानांना समर्थपणे घेतो तोच जीवनात यशस्वी होतो.

Adventure tour, that's 600 km ... | अ‍ॅडव्हेंचर टूर, तोही ६०० किलोमीटरचा ...

अ‍ॅडव्हेंचर टूर, तोही ६०० किलोमीटरचा ...

Next
ठळक मुद्देग्वाल्हेरहून निघालेले सायकलस्वार दल नागपुरात दाखल : सिंधिया शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आव्हाने हा जीवनाचा भाग आहे. मात्र आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आव्हानांना समर्थपणे घेतो तोच जीवनात यशस्वी होतो. कोणत्याही अ‍ॅडव्हेंचरमधून यशस्वीतेचं हे तंत्र शिकता येते. शनिवारी ग्वाल्हेर येथील सिंधिया शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे अ‍ॅडव्हेंचर दल सायकलने ६०० किलोमीटरचा प्रवास करीत नागपुरात पोहचले तेव्हा प्रत्येक सदस्यांच्या चेहºयावर असाच यशस्वीतेचा भाव दिसून येत होता.
या दलात २४ सदस्यांचा सहभाग होता. यामध्ये सिंधिया शाळेतील ११ व्या वर्गाचे १८ विद्यार्थी आणि सहा शिक्षकांचा समावेश आहे. ही अ‍ॅडव्हेंचर टूर ६ दिवसाची होती, त्यानुसार दलातील सदस्य २३ आॅक्टोबरला ग्वाल्हेरहून निघाले. दलातील सदस्य विद्यार्थी ध्रुव पेरिवाल याने लोकमतशी बोलताना या संपूर्ण टूरची माहिती दिली. अ‍ॅडव्हेंचर टूर ठरल्यानंतर या दलात सहभागी होणाºया प्रत्येक सदस्याची फिटनेस टेस्ट आणि सायकल अ‍ॅबिलिटी टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर २३ ला शाळेच्या पदाधिकाºयांनी सायकलस्वर दलाला रवाना केले. निघताना एक उत्साह होता. वाटेत अनेक समस्या आल्या. काही सदस्यांच्या सायकली पंक्चर झाल्या. मोठमोठ्या डोंगर घाटांचे अडथळे आले. मात्र या सर्वांमध्ये एक जिद्द होती. सोबत टीमवर्क आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचा आत्मविश्वास होता. त्यामुळे अशा समस्या व अडथळ्यांवर मात करून अखेर यशस्वीपणे नागपूरला पोहचल्याचे धु्रवने सांगितले. या सहा दिवसाच्या टूरमध्ये वाटेत ललितपूर, सागर, करेली, अमरवाडा आणि सौंसर अशा पाच ठिकाणी मुक्काम केल्याचे त्याने सांगितले.
प्रत्येकाच्या सायकलवर कमीतकमी लगेज राहील याची काळजी घेण्यात आली. मात्र पाण्याची बॉटल, ओआरएस किंवा ग्लुकोज आदी साहित्य प्रत्येकाकडे होते. अत्यावश्यक वैद्यकीय साहित्या व इतर महत्त्वाचे सामान असलेली एक कार नियमित दलाच्या सोबत असल्याचे त्याने सांगितले. मात्र वाटेत कुणाच्याही प्रकृतीची समस्या निर्माण न झाल्याचे त्याने स्पष्ट केले. प्रत्येकाचा वेग सारखा नव्हता. मात्र एकमेकांसोबत हे अ‍ॅडव्हेंचर पूर्ण करण्याचा संयम होता. त्यामुळे अतिशय सहजपणे ६०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्याची भावना दलातील प्रत्येक सदस्यांनी व्यक्त केली.
हे सर्व सदस्य सीताबर्डीतील माहेश्वरी पंचायत येथे मुक्क ाम करणार असून रविवारी आयक्निल नागपूरच्या सदस्यांसोबत पाटणकर चौक, कामठी रोड येथे स्वच्छता अभियान व भिंत सुशोभीकरणाच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सायंकाळी रेल्वेने हे सदस्य ग्वाल्हेरसाठी रवाना होणार आहेत.
दलातील सदस्य
शिक्षक : रक्षा सिरिया, पूजा पंत या महिलांसह अनिल पठानिया, श्रीजित पिल्लई, विशेष सहाय, मनोज मिश्रा हे शिक्षक सहभागी होते
विद्यार्थी : धु्रव पेरिवाल, मोहित असानी, सोमांश गिरधर, प्रियांशु अग्रवाल, प्रणव पहावा, सिद्धार्थ अग्रवाल, कुशाग्र पटवारी, कुशाग्र गुप्ता, अतुल कुमार, वंश त्यागी, अनिकेत भाटी, क्लिओमल लिंबू, श्रेय अग्रवाल, शशांक किलोरे, दिवांश अग्रवाल, केविन चौधरी, रचित अग्रवाल

ही तर सिंधिया शाळेची परंपरा
या दलात सहभागी शिक्षिका रक्षा सिरिया यांची ही १५ वी अ‍ॅडव्हेंचर टूर आहे. त्यांच्यासोबत इतरही शिक्षकांनी अनेकदा अशाप्रकारे सायकलने अ‍ॅडव्हेंचर ट्रीपमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी सांगितले, दरवर्षी अशाप्रकारे सायकलने अ‍ॅडव्हेंचर टूर काढणे ही सिंधीया शाळेची अनेक वर्षाची परंपरा आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सक्षमतेचे धडे देण्यासाठी इतरही अ‍ॅडव्हेंचर उपक्रम राबविले जात असून आमच्या दलाप्रमाणे शाळेतील इतर विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी झाले आहेत. यावर्षीच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून पुढल्या वर्षी इतर विद्यार्थी या अ‍ॅडव्हेंचरसाठी उत्साहाने तयार होतात. शारीरिक सुदृढता, टीम वर्क आणि संयमाचे धडे देण्यासाठी असे उपक्रम राबविले जात असतात. पर्यावरण संरक्षणाचा संदेश ही सायकलिंग टूरची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Adventure tour, that's 600 km ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.