हवामान बदलाचा राज्यातील शेतपिकांवर वाईट परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:58+5:302021-09-04T04:11:58+5:30
नागपूर : राज्यातील शेतपिकांवर हवामान बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ही बाब मान्य केली आहे. ...
नागपूर : राज्यातील शेतपिकांवर हवामान बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ही बाब मान्य केली आहे.
शेतातून अधिक उत्पादन घेण्यासाठी जैविक व अजैविक घटक नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अजैविक घटकांमध्ये ऊन, वारा, पाऊस, ढग, माती, धूळ, वातावरणातील वायू, आर्द्रता व तापमान तर, जैविक घटकांमध्ये मातीमधील सूक्ष्मजीव, परागकण, कीटक, बुरशी, प्राणी व माणसांचा समावेश होतो. त्यातील हस्तक्षेपामुळे तापमान वृद्धी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. त्याचा वाईट परिणाम शेतपिकांवर होत आहे. हवामान बदलाचा अधिक परिणाम सोयाबीन, कापूस, गहू, चणा व धान पिकावर झाला आहे. याशिवाय जनावरांची मुदतपूर्व प्रसूती होत आहे.
विदर्भामध्ये गहू व ज्वारी बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाली आहे. कापसाची बोंडे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच फुटत आहेत. लिंबूवर्गीय फळे मोठ्या संख्येत गळून पडत आहेत. सोयाबीन पिवळे होत आहे. पाऊस अनियमित होत आहे. पश्चिम व मध्य महाराष्ट्र भागात दरवर्षी ६०० ते १००० मिलीमीटर पाऊस पडतो. विदर्भात गेल्या दोन वर्षात १२०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे.
--------------------
कापसावर अळ्यांचे संकट
आधी केवळ अमेरिकन बॉलवॉर्म कापसावर हल्ला करीत होते. आता बॉलवॉर्मसह शोषक अळ्याही कापूस नष्ट करीत आहे. कापसासह उडीद, मूग, सोयाबीन इत्यादी पिकेही संकटात आहेत. हा हवामान बदलाचा परिणाम आहे.
-- माधव शेंबेकर, संचालक, अंकुर सीड्स.
---------------
उत्पादन कमी झाले
हवामान बदलाचा परिणाम शेतपिकाच्या उत्पादनावरही होत आहे. संत्री, मोसंबी व सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. पिकांवर अळ्या, कीटक व बुरशीचा हल्ला होत आहे. पूर्व विदर्भातील धान पिकाचेही नुकसान होत आहे.
-- डॉ. निशांत शेंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालय.