कंपन्यांच्या दारू ब्रॅण्डची विक्रेत्याच्या दुकानांवर जाहिरात; कायद्याचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:33+5:302021-09-17T04:13:33+5:30

नागपूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार दारू दुकानाच्या दर्शनी भागावर कंपनीच्या दारू ब्रॅण्डची जाहिरात करणारे बोर्ड झळकविण्यास मनाई आहे. ते ...

Advertising of companies' liquor brands in vendor shops; Violation of law | कंपन्यांच्या दारू ब्रॅण्डची विक्रेत्याच्या दुकानांवर जाहिरात; कायद्याचे उल्लंघन

कंपन्यांच्या दारू ब्रॅण्डची विक्रेत्याच्या दुकानांवर जाहिरात; कायद्याचे उल्लंघन

Next

नागपूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार दारू दुकानाच्या दर्शनी भागावर कंपनीच्या दारू ब्रॅण्डची जाहिरात करणारे बोर्ड झळकविण्यास मनाई आहे. ते कायद्याचे उल्लंघन ठरते. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षी दुकानावरील दारू कंपन्यांची जाहिरात करणारे बोर्ड हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही काही दुकानांवर कंपन्यांच्या दारूचे ब्रॅण्ड झळकत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. त्याचा परिणाम लहान मुलांवर होत असून, असे बोर्ड तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.

दुकानांवर दारूच्या ब्रॅण्डचे बोर्ड असतानाही अधिकाऱ्यांना का दिसत नाहीत, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने दारूची जाहिरात करण्यावर प्रतिबंध लावला आहे. त्यानंतरही दुकानावर अशा जाहिराती का झळकत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. काही दुकानांवरील जाहिरातींवर लाईट लावल्याने १०० फूट अंतरावरूनही दारूचा ब्रॅण्ड सहजपणे वाचता येतो. दुकान आणि बारचे बोर्ड दारू कंपन्याच तयार करून देतात. त्यावर दुकानदार वा बारचे नाव छोट्या अक्षरात असते, तर दारूच्या ब्रॅण्डचे नाव बॉटलसह मोठ्या अक्षरात असते. राज्य शासनाचा कायदा माहीत असतानाही कंपन्या आणि विक्रेते दारूचे ब्रॅण्ड बोर्डवर झळकवितात. विक्रेत्यांना उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची भीतीच नसल्याने कायद्याचे उल्लंघन सर्रास होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. दारूच्या जाहिरातीचा लहान मुले आणि महिलांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे दारू ब्रॅण्डच्या जाहिराती तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली.

कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निरीक्षकांना आदेश

निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गस्त घालून सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. काही गैर आढळून आल्यास तात्काळ नियमानुसार योग्य ती कारवाई करून त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डवर दुकानाच्या नावाशिवाय कोणत्याही प्रकारची जाहिरात असू नये.

प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर.

Web Title: Advertising of companies' liquor brands in vendor shops; Violation of law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.