आॅनलाईनमध्ये अडली शिष्यवृत्ती
By admin | Published: April 17, 2017 02:03 AM2017-04-17T02:03:19+5:302017-04-17T02:03:19+5:30
अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या
सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्तीचे वाटप रखडले
मंगेश व्यवहारे नागपूर
अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने ‘सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती’ देण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या शिष्यवृत्तीची कार्यप्रणाली आॅनलाईन झाल्याने योजनेचा लाभच विद्यार्थ्यांना मिळालेला नाही.
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना २०१०-११ पासून सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत आदिवासी १ ते ५ वर्गासाठी १००० रुपये व ६ ते १० या वर्गासाठी १५०० रुपये शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती आहे. पूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संबंधित मुख्याध्यापकांच्या नावे या शिष्यवृत्तीचा धनादेश पाठवीत होते. हा धनादेश वटवून लाभार्थी विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्याची जबाबदारी संबंधित शाळांची होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी अनेकवेळा परस्पर तो आपल्या खात्यात जमा करून या शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर खर्च करीत असल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याची ओरड होत होती. त्यामुळे शासनाने ही योजना आॅनलाईन करून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. परंतु आॅनलाईनमुळे या योजनेलाच ग्रहण लागले. दोन सत्र संपल्यानंतरही आॅनलाईन प्रक्रिया दुरुस्त करण्यात आली नाही.
आदिवासींच्या बाबतीत गांभीर्यच नाही
योजना आॅनलाईन नव्हती तेव्हाही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते. आता आॅनलाईन झाल्यानंतरही हीच अवस्था आहे. शिष्यवृत्तीसाठी शाळा आदिवासी विभागावर व विभाग शाळांवर हे प्रकवण ढकलत आहे. याचाच अर्थ कुणीच गंभीर नसल्याचे दिसून येत आहे