सल्लागार समितीसाठी कुलगुरूंना ‘सल्ला’ कुणाचा?
By admin | Published: September 29, 2015 04:18 AM2015-09-29T04:18:49+5:302015-09-29T04:18:49+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणांमध्ये ‘यंग टीचर्स असोसिशन’ व ‘नुटा’चे वर्चस्व असले
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणांमध्ये ‘यंग टीचर्स असोसिशन’ व ‘नुटा’चे वर्चस्व असले तरी विधीसभेत मात्र ‘सेक्युलर पॅनल’चा प्रभाव होता. ३१ आॅगस्टनंतर प्राधिकरणे संपुष्टात आली अन् विद्यापीठाची सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती आली. वर्षभर फक्त प्रशासनाचेच वर्चस्व असेल असे अपेक्षित होते. परंतु विद्यापीठाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी कुणाला विश्वासात न घेता अचानक सल्लागार समितीची स्थापना केली. त्यामुळे विद्यापीठातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून या सल्लागार समितीच्या स्थापनेसाठी कुलगुरूंना नेमका सल्ला कुणी दिला असा सवाल अधिकाऱ्यांकडूनच दबक्या आवाजात विचारण्यात येत आहे.
राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाच्या सिनेट, विद्यापीठ प्राधिकरणे, मंडळे आदींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या हाती पूर्ण कारभार असताना कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम १४(१)नुसार सल्लागार समितीची स्थापना केली. यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. परंतु विद्यापीठातील अधिकाऱ्यांची ‘टीम’ पूर्ण झाली असताना खरोखरच अशाप्रकारच्या सल्लागार समितीची आवश्यकता होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही समिती स्थापन करीत असताना कुलगुरूंनी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनादेखील विश्वासात घेतले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठातील सर्व अधिकारी चांगले काम करण्यास सक्षम आहेत. वेळोवेळी कुलगुरू त्यांचा सल्लादेखील घेतात. अशास्थितीत त्यांना सल्लागार समिती स्थापन करण्याची गरज पडली याचा अर्थ अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास नाही का, अशी संतप्त प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. विद्यापीठ कायद्याच्या कलम १४(१)प्रमाणे अशी समिती गठित करण्याचा कुलगुरूंना अधिकारच नाही.
शिवाय यात वित्त व लेखा अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. मग आर्थिक प्रकरणांशी संबंधित मुद्यांवर कोणाला विचारणा करणार, असे मत एका माजी प्राधिकरण सदस्याने व्यक्त केले. प्र-कुलगुरू डॉ.येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वेदप्रकाश मिश्रा अध्यक्षपदी
सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा इन्स्टिट्यूूट आॅफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे आहेत. सोबतच ‘व्हीएनआयटी’च्या संचालक परिषदेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग, ‘सर्च फाऊंडेशन’चे डॉ. अभय बंग, ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ रुरल इंडस्ट्रलायझेशन’चे संचालक डॉ. प्रफुल्ल काळे, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, माजी प्र-कुलगुरू डॉ. योगानंद काळे, मिहानचे उपाध्यक्ष तसेच डॉ.वीणा प्रकाशे हे समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत.