नागपुरात होणार एरो मॉडेलिंग शो; क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 11:36 AM2022-02-23T11:36:55+5:302022-02-23T11:41:16+5:30
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराची विमाने (मानव विरहित) उडविण्यात येणार आहेत.
नागपूर : राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या शोचा थरार थेट पाहायला मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
मुंबई येथे मंत्रालयात एरो मॉडेलिंग शोविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस क्रीडा विभागाचे आयुक्त प्रकाश बकोरिया हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते, तर कर्नल अमित बाली, ब्रिगेडिअर लाहिरी, कॅप्टन सतपाल सिंग यांची उपस्थित होती. यावेळी केदार म्हणाले, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराची विमाने (मानव विरहित) उडविण्यात येणार आहेत.
हा शो पाहण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून विद्यार्थी येतील. हा शो क्रीडा विभाग, एनसीसी आणि सैन्य दल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विद्यार्थ्यांना एरो माॅडेलिंगविषयी माहिती होऊन त्याबद्दलचे आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण होईल. अशा उपक्रमामुळे सैन्यदलाविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.