अॅफकॉन्सने भाचीला हाताशी धरून आत्याचेही शेत खोदले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:31+5:302019-08-31T06:00:47+5:30
तहसीलदार, पोलिसात तक्रार, एक कोटीचे नुकसान
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समृद्धी महामार्गाचे मुख्य कंत्राटदार अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स व उपकंत्राटदार किती बेमुर्वतखोरपणे शेतकऱ्याच्या जमिनी मुरुमासाठी खोदून निकामी करत आहेत त्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
या प्रकरणात अॅफकॉन्स व तिच्या उपकंत्राटदाराने भाचीला प्रलोभन देत तिच्या आत्याचेही सामाईक शेत खोदून काढले व एक कोटीचे नुकसान केले आहे.
सेलू तालुक्यातील चारमंडल गावात वनिता दिवाकर मुंगुले व सुवर्णा मनोहर गलांडे या दोन महिलांच्या सामाईक मालकीचे सहा एकर शेत (सर्व्हे नं. २२१) आहे. वनिता या सुवर्णा यांच्या आत्या आहेत. जून २०१९ मध्ये अॅफकॉन्सचे मध्यस्थ रॉबर्ट व कादर बादशाह यांना परस्पर गाठून त्यांच्याशी मुरुम उत्खनन करण्याचा करार केला व केवळ पाच दिवसात १.५० ते १.७५ एकर शेत खोदून मुरुम काढून नेला. हे सर्व गैरप्रकार करताना अॅफकॉन्स वा त्याच्या मध्यस्थांनी वनिता मुंगुले यांची परवानगी तर घेतली नाहीच पण त्यांच्याशी किंवा त्यांचा मुलगा यशवंत मुंगुले याच्याशी संपर्कसुद्धा केला नाही.
‘लोकमत’शी बोलताना यशवंत मुंगुले म्हणाले, माझी आई वनिता ही क्षीरसमुद्रपूर येथे राहते, त्यामुळे शेताकडे क्वचितच जाते. जूनमध्ये नातेवाईकांनी शेतात मुरूम खुदाई सुरू असल्याचे सांगितले. चारमंडलला जाऊन पाहिले असता अॅफकॉन्स कंपनीची पोकलेन मशीन मुरुम खोदत असल्याचे दिसले. यानंतर दि. १७ जून २०१९ रोजी आईने सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांचेकडे लेखी तक्रार केली व त्याच दिवशी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्सचे प्रकल्प अधिकारी अनिल कुमार यांचेकडेही तक्रार नोंदली. आमच्या शेताचे एक कोटीचे नुकसान झाले आहे ते भरून द्यावे, अशी मागणी आम्ही तक्रारीत केली. कारवाई न झाल्याने ३० आॅगस्ट २०१९ रोजी दहेगाव पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा तक्रार दिली.
सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी सांगितले की, वनिता मुंगुले यांची तक्रार मिळाली. परंतु, अॅफकॉन्सविरुद्व अशीच तक्रार कोझी प्रॉपर्टीजनेसुद्धा केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार नेमके किती नुकसान झाले ते ठरविण्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर कारवाई होईल.
अॅफकॉन्सच्या उपकंत्राटदारांची दहशत
अॅफकॉन्सच्या उपकंत्राटदाराने वनिता मुंगुले यांचे शेत जूनमध्येच खोदले होते, पण त्याची पोलीस तक्रार त्यांचा मुलगा यशवंत मुंगुले यांनी तब्बल दोन महिन्यांनी केली. यावरून अॅफकॉन्स व उपकंत्राटदारांनी किती दहशत पसरवली आहे ते कळते. अॅफकॉन्सची ही दंडेली रोखण्यासाठी आता जिल्हा व पोलीस प्रशासन काय कारवाई करते, त्याबद्दल औत्सुक्य आहे.