नागपूर जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:24 PM2018-04-13T15:24:16+5:302018-04-13T15:24:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यांनी आज आरोग्य उपसंचालकाच्या कार्यालयापुढे दिवसभर धरणे दिले.
नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागात ७०० च्या वर एनआरएचएमचे कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील यंत्रणा सुरळीत सुरू आहे. सरकार आता ही यंत्रणासुद्धा बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी काही अटी आणि शर्ती शासनाने टाकल्या आहेत. या अटीनुसार या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन होणार असून, त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. त्यातून वेतनवाढ होणार आहे. परंतु ही अट कर्मचाऱ्यांना जाचक वाटत आहे. यात कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचीसुद्धा वेळ येणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांची सहा-सहा महिन्याची पुनर्नियुक्ती प्रक्रिया शासनाने राबविली आहे. यालाही कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर’लागू केले आहे. त्यानुसार त्यातही त्रुटी आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे. २००५ पासून एनआरएचएमच्या माध्यमातून हे कर्मचारी आरोग्य विभागात सेवा देत आहेत. बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात ही यंत्रणा सक्षम ठरली आहे. लसीकरण, प्रसूती, ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ही यंत्रणा प्रयत्नरत आहे.
आरोग्य विभागातील रिक्त जागांची जबाबदारी या यंत्रणेने अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. परंतु शासनाने त्यांच्यावर लादलेल्या जाचक अटी व शर्तींच्या विरोधात हे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे. त्याचा परिणाम गुरुवारपासून ग्रामीण भागात दिसायला लागला आहे. आज बहुतांश उपकेंद्रे बंद होती. शासनाने या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन द्यावे, अशा मागण्या या कर्मचाºयांच्या आहेत. एनआरएचएम अधिकारी-कर्मचारी महासंघ नागपूरचे अध्यक्ष नीलेश सोनवणे, उपाध्यक्ष रज्जू परिपगार, कांचन राऊत, उन्मेश कापसे, लता माहुरे, माला काकडे, मीना महाजन, रत्ना कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
हक्काच्या घरात आंदोलनाची परवानगी नाकारली
जि.प.च्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे. परंतु यांना जि.प.मध्ये आंदोलन करण्याची परवानगी सीईओंनी नाकारली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी आहे.