आरटीओचे कामकाज प्रभावित
By admin | Published: June 17, 2017 02:24 AM2017-06-17T02:24:11+5:302017-06-17T02:24:11+5:30
आरटीओ कार्यालयांमधील कामकाजात गती यावी, अर्जदारांचा वेळ वाचवा व पारदर्शकपणा आणण्यासाठी ‘सारथी
विजेचा लपंडाव : जनरेटरची सोय नाही, संथ गतीच्या सर्व्हरमुळेही फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीओ कार्यालयांमधील कामकाजात गती यावी, अर्जदारांचा वेळ वाचवा व पारदर्शकपणा आणण्यासाठी ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात झाली. परंतु पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातील या संथ गतीच्या सर्व्हरमुळे गेल्या व काही दिवसांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने १० मिनिटांच्या कामाला दोन तासाचा वेळ लागत आहे. याचा फटका कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून ते विविध कामांसाठी येणाऱ्यांना बसत आहे.
राज्यातील आरटीओ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या नव्या ‘वेब बेस’ प्रणालीद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. या प्रणालीमध्ये शिकाऊ वाहन परवाना व पक्क्या वाहन परवान्यासाठी लागणाऱ्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’सह इतरही अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून ही प्रणाली सुरू झाली आहे तेव्हापासून आरटीओ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी व अर्जदाराला विविध समस्यांमधून जावे लागत आहे. पूर्व नागपूरच्या आरटीओ कार्यालयामधील हे दोन्ही सर्व्हर नेहमीच संथ गतीने चालत असल्याची तक्रार आहे. यातच वारंवार बंद पडणारे इंटरनेट व गेल्या काही दिवसांपासून विजेच्या वाढलेल्या लपंडावामुळे अर्जदाराच्या दहा मिनिटांच्या कामाला दोन तासावर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.