गडकरी-चतुर्वेदी यांच्यात जिव्हाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:42 AM2018-02-20T00:42:59+5:302018-02-20T01:00:34+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे यासाठी गडकरी दिल्ली येथील बैठकीनंतर विशेष विमानाने नागपुरात पोहोचले होते. यानिमित्ताने गेल्या काही दिवसांत गडकरी व चतुर्वेदी यांच्यातील ‘वाढत्या स्नेहा’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे यासाठी गडकरी दिल्ली येथील बैठकीनंतर विशेष विमानाने नागपुरात पोहोचले होते. यानिमित्ताने गेल्या काही दिवसांत गडकरी व चतुर्वेदी यांच्यातील ‘वाढत्या स्नेहा’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमात सुुरुवातीला चतुर्वेदी यांनी गडकरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. आपल्या भाषणातून गडकरी यांनीही चतुर्वेदी यांची प्रशंसा केली. कार्यक्र मादरम्यान दोघेही व्यासपीठावर आजूबाजूला बसले होते. आपसात चर्चा करीत होते. उभय नेत्यांमधील वाढती जवळीकीचा ‘राजकीय पंडित’ वेगवेगळा अर्थ लावत आहेत. काँग्रेसमधील गटबाजीच्या कारणावरून प्रदेश काँग्रेस कमिटीने नोटीस बजावल्याने चतुर्वेदी नाराज आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी चांगलीच उफाळली होती. एका जाहीर सभेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्याच्या प्रकरणात चतुर्वेदी यांचे नाव चर्चेत आले होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेता निवडणुकीत कायद्याच्या लढाईत चतुर्वेदी यांचे समर्थक तानाजी वनवे विरोधी पक्षनेते बनले. दरम्यान प्रदेश काँग्रेसने चतुर्वेदी यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीला चतुर्वेदी यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असतानाच गडकरी व चतुर्वेदी यांनी एकमेकांची जाहीर कार्यक्रमात प्रशंसा केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
यासंदर्भात चतुर्वेदी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मी अराजकीय व्यासपीठावर एकत्र आलो होतो. हा एक शैक्षणिक कार्यक्रम होता. तो एअरोनॉटिकल सोसायटी आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यात एअरव्हाईस मार्शल एस. पडेगावकर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री म्हणून गडकरी यांना निमंत्रित केले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाच्या मंत्र्यांसोबत व्यासपीठावर एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण भाजपा मंत्र्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत.