घरचे साधे पाणी परवडले; पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:43+5:302021-05-01T04:06:43+5:30
- लॉकडाऊनचा परिणाम : शुद्धीकरणाचे प्रकल्प बंद नागपूर : उन्हाळ्यात लग्नकार्य असो वा कोणताही समारंभ किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जारमध्ये ...
- लॉकडाऊनचा परिणाम : शुद्धीकरणाचे प्रकल्प बंद
नागपूर : उन्हाळ्यात लग्नकार्य असो वा कोणताही समारंभ किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जारमध्ये भरलेल्या शुद्ध पाण्याची विक्री वाढते. पण, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जारची विक्री मंदावली आहे. लॉकडाऊनमध्ये लग्नकार्य होत नसल्याने आणि प्रतिष्ठाने बंद असल्याने जारची विक्री जवळपास बंदच झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. पण, मालकांनी कोरोनाकाळात जार नको, घरचे पाणी पिण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांनी पाणी शुद्धीकरणाचे लहान-मोठे प्रकल्प बंद केले आहेत. त्यामुळे जारमध्ये भरलेल्या पाण्याची विक्री बंद झाली आहे. विक्रेत्यांनी सांगितले, दरवर्षी मार्च ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लग्नकार्य असल्याने जारची (एक जार १८ लिटर शुद्ध पाणी) सर्वाधिक विक्री होते. पण, यंदा लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत होत असल्याने जार बोलविण्याच्या भानगडीत कुणीही पडत नाही. नागपूर शहरात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत जवळपास ५०० पेक्षा जास्त प्रकल्प आहेत. ८० ते ९० टक्के प्रकल्प सुरू आहेत. प्रत्येक प्रकल्पात दररोज २०० पेक्षा जास्त जारची निर्मिती होते. एका जारची किंमत २५ ते ३० रुपये असून, त्यानुसार उन्हाळ्यात दररोज ३० लाखांचा व्यवसाय होतो. त्या उद्योगावर अडीच ते ३ हजार जणांना रोजगार मिळतो. पण, सध्या हा व्यवसाय बंद असल्याने रोजगार बुडाला आहे. त्यामुळे प्रकल्पांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
सध्याच्या ट्रेंडनुसार नागपुरातील प्रत्येक प्रतिष्ठानमध्ये दररोज एक वा दोन जार मागविले जातात. शिवाय, लग्नकार्य आणि अन्य समारंभात मागणी वेगळी असते. त्यानुसार दररोज ६ ते ७ हजार जारची विक्री होते. पण, सध्या लग्नकार्याअभावी आणि प्रतिष्ठाने बंद असल्याने संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. अनेकांनी लाखो रुपये कर्ज काढून प्रकल्प उभे केले आहेत. गेल्या वर्षी पाच ते सहा महिने आणि यंदा मार्चपासून विक्री बंद असल्याने कर्जाचा भरणा अनेकांना कठीण होत आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. बँक कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. अशा कठीण परिस्थितीतून या उद्योगाची वाटचाल सुरू आहे.
मनपाकडे १२७ प्रकल्पांची नोंद
मनपाने एक वर्षापासून जारमध्ये भरलेल्या पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पाची नोंदणी आणि मान्यता देणे बंद केले आहे. पण, त्यापूर्वी १२७ प्रकल्पांची नोंद आहे. याशिवाय शहरात अनेक अनोंदणीकृत प्रकल्प सुरू आहेत. बीआयएसने अधिसूचना काढून नियमबाह्य आणि नोंदणी नसलेल्या प्रकल्पांना बंद करण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्पासाठी बीआयएसने परवाना बंधनकारक केला आहे. बीआयएसने जवळपास २२ प्रकल्पांवर कारवाई केली आहे.
जारचे पाणी बंद
५ मार्चपासून दुकानाच्या अनियमित वेळा आणि १५ मार्चपासून प्रतिष्ठान बंद असल्याने जारचे पाणी बोलवित नाही. शिवाय, पुढेही दुकान कितीवेळ सुरू राहील, यावर अनिश्चितता असल्याने घरच्या पाण्यावर भर राहील.
अशोक आमधरे, ऑटोमोबाईल विक्रेते.
जारच्या पाण्याला नकार
लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने जारचे पाणी बोलविण्याचा प्रश्न नाही. पूर्वी दुकानात दररोज दोन जार लागायचे. पण, आता बोलविणे बंद केले आहे. जारच्या पाण्याऐवजी घरचे पाणी केव्हाही चांगले आहे.
राकेश माटे, हार्डवेअर विक्रेते.
लॉकडाऊनमुळे बहुतांश प्रकल्प बंद
लॉकडाऊनचा फटका पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पांना बसला आहे. निर्मिती बंद असल्याने जार विक्रीचा प्रश्नच नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा उन्हाळ्यात जार विक्री व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. प्रत्येकावर बँकांच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. अनेकांचे हप्ते आणि प्रतिष्ठानाचे भाडे थकले आहे. काम करणाऱ्या युवकांचा रोजगार गेला आहे. कोरोना महामारीने सर्वांवर संकट आले आहे.
विमल अग्रवाल, संचालक, आरओ प्रकल्प.
शहरात जार निर्मितीचे प्रकल्प :
मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी विक्री - ६ ते ७ हजार जार
मार्च २०२० मध्ये दररोज होणारी विक्री - ४ ते ५ हजार
मार्च २०२१ मध्ये दररोज होणारी विक्री - ५०० ते ६००