पोलिसांनी १२ वर्षांनंतर नक्षल्यांचा हिशेब चुकविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:42+5:302021-05-22T04:07:42+5:30
फहीम खान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पैदी येथील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी १३ ...
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पैदी येथील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यातून पोलिसांनी १२ वर्षांअगोदर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता केला आहे.
२१ मे २००९ रोजी गडचिरोली जिल्हा पोलिसांवर धानोरा तहसील येथील हाथीगोटा परिसरात लपलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यादरम्यान नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात १६ जवान शहीद झाले होते. त्यात पाच महिला पोलीस कर्मचाऱ्यांचादेखील समावेश होता. पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात महिला पोलिसांना टार्गेट करण्यात आले होते. यानंतर जिल्हा पोलीस नक्षल्यांना प्रत्युत्तर देण्याची संधी शोधत होते. अखेर २१ मे रोजीच पोलिसांनी १३ नक्षल्यांना ठार करत १२ वर्षांअगोदरच्या घटनेचा बदला घेतला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी राजेश प्रधान यांनी लोकमतशी बोलताना गडचिरोली पोलिसांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव घेणाऱ्यांना योग्य उत्तर देण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हे जवान झाले होते शहीद
२००९ च्या घटनेत शफी भक्तदास शेट्टीवार, हवालदार सुरेश किरंगे, हेमराज टेंभुर्णे, नायक काशीनाथ रोहणकर, दामोदर नैताम, सदानंद मडावी, संतोष दुर्गे, विलास मंडले, माणिक उसेंडी, शोभा ताडे, गेंदकुमार फरदिया, शकुंतला आलाम, अलका गावडे आणि सुनीता कल्लो शहीद झाले होते.