तब्बल ३३ वर्षांनी ते भेटले नातेवाईकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:38 PM2018-03-05T19:38:38+5:302018-03-05T19:56:46+5:30
तब्बल ३३ वर्षानंतर समोर ८५ वर्षीय वडिलांना पाहून मुलांना अश्रू आवरता आले नाही. त्या दोघांना जगण्याची एक उमेद मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शीच मानसिक संघर्ष सुरू होता. या संघर्षात ते पोलिसांकडून प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाले. अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. मात्र गेल्या आठवड्यात अचानक ते डॉक्टरांजवळ गेले. डॉक्टरांचा हात हातात घेऊन ‘घर जाना है’ एवढेच म्हणाले. त्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडून घराचा शोध सुरू होता, परंतु पत्ता सापडत नव्हता. पण यावेळी त्यांनी नेमका पत्ता सांगितला. रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना ही बातमी दिली, परंतु त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मोबाईलवरून त्यांचे लाईव्ह बोलणे करून दिल्यावर त्यांचा विश्वास बसला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची दोन्ही मुले रुग्णालयात पोहचली. तब्बल ३३ वर्षानंतर समोर ८५ वर्षीय वडिलांना पाहून मुलांना अश्रू आवरता आले नाही. त्या दोघांना जगण्याची एक उमेद मिळाली होती.
जसीम करिया (८५) रा. सुल्तानपूर, कादिपूर, तावाकलपूर उत्तर प्रदेश, बºया झालेल्या त्या मनोरुग्णाचे नाव. प्रादेशिक मनोरुग्णालयात ते ‘सुरती’ नावाने ओळखले जायचे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १९८५ मध्ये सुरती अचानक घरून निघून गेले. फिरत-फिरत ते नागपुरात आले. रस्त्यावर विक्षिप्त वागणूक करीत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. विचारपूस केली असता ते मनोरुग्ण असल्याची शंका आली. पोलिसांनी त्यांना कोर्टापुढे हजर करीत प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावरील उपचारात ३३ वर्षे निघून गेली. सोमवारी अचानक सुरती डॉक्टरांकडे आले. त्यांचा हात हातात घेऊन ‘घर जाना है’ असे म्हणत त्यांनी संवाद साधला. डॉक्टरांना आश्चर्य वाटले, परंतु त्यांची खात्री पटल्यावर त्यांनी रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक अनघा राजे-मोहरील यांना याची माहिती दिली. मोहरील यांनी त्यांच्याकडून पत्ता समजून घेतला. लागलीच त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या मदतीने सुल्तानपूर, कादिपूर, तावाकलपूर गावांचा शोध घेतला.
पोलीस त्यांच्या घरी गेले, परंतु होळीचा सण तोंडावर असल्याने आणि ३३ वर्षानंतर आपले वडील जिवंत असल्याच्या माहितीवर घरच्यांचा विश्वासच बसला नाही. अखेर मोबाईलच्या मदतीने दोघांचे ‘लाईव्ह’ बोलणो करून दिले, तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला. दुस:याच दिवशी ‘सुरती’ यांची दोन्ही मुले त्यांना घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात पोहचली. रुग्णालयातील सोपस्कार पार पडले. त्यांना दुस:या खोलीत घेऊन गेले, सामोर वडिलांना पाहून दोन्ही मुलांना रडू कोसळले. वडीलही भावुक झाले. ३३ वर्षानंतर वडील मिळाल्याचा तर मानसिक आजारामुळे विश्वच हरवून बसलेल्या सुरती यांना आपले कुटुंब मिळाल्याचा आनंद दोघांच्या चेह:यावर होता. यावेळी रुग्णालय प्रशासनातर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे, वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, मोहरील यांनी सुरती यांना शाल, मिठाई देऊन निरोप दिला. जाताना नियमित औषधे घेण्याचा सल्ला डॉ. नवखरे यांनी दिला, तर कुठलीही अडचण आल्यास फोनवर संपर्क साधण्याची सूचना डॉ. गुल्हाने यांनी केली. यावेळी रुग्णालयातील अटेन्डंट सुरेश लोखंडे यांनी ८५वर्षीय सुरती यांना कपडे घालण्यापासून ते त्यांना आधार देण्यार्पयतची मदत केली. रुग्णालयासाठी ही घटना ते करीत असलेल्या सेवाकार्याला बळ देऊन गेली.