३६ तासानंतरही सापडला नाही अदनान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:23 PM2018-08-22T22:23:44+5:302018-08-22T22:24:32+5:30

चेंडू पकडण्याचा प्रयत्नात पिवळ्या नदीत वाहून गेलेल्या अदनान कुरैशी या ८ वर्षाच्या मुलाचा ३६ तास होऊनही शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि असहकारामुळे मुलाचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

After 36 hours Adnan could not be found | ३६ तासानंतरही सापडला नाही अदनान

३६ तासानंतरही सापडला नाही अदनान

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाची मोहीम केवळ खानापूर्ती : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चेंडू पकडण्याचा प्रयत्नात पिवळ्या नदीत वाहून गेलेल्या अदनान कुरैशी या ८ वर्षाच्या मुलाचा ३६ तास होऊनही शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि असहकारामुळे मुलाचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
मंगळवारी सकाळी वनदेवीनगर येथे आठ वर्षाचा अदनान कुरैशी हा पिवळ्या नदीत वाहून गेला होता. अदनान मुलांसोबत खेळत होता. या दरम्यान पिवळ्या नदीत वाहून आलेला चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरून तो नदीत बुडाला. त्याला वाचवण्यासाठी कुणी पोहोचण्यापूर्वीच तो पाण्यासह वाहून गेला. तेव्हापासून अदनानचा शोघ घेण्यात येत आहे.
अग्निशमन विभागाच्या दोन बोटीच्या मदतीने शोध घेतला जात आहे. कुटुंबीय आणि वस्तीतील नागरिकही त्याला शोधत आहेत. मंगळवरी दुपारी शोधमोहिम सुरु करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता अग्निशमन दलाच्या चमूने आपले हात वर केले आणि ते माघारी परतले. बुधवारी पुन्हा सकाळपासून शोधकार्य सुरू केले जाईल, असे सांगून ते गेले. ते गेल्यानंतरही कुटुंबीय आणि नागरिक मात्र शोध घेत होते.
बुधवारी सकाळी नागरिक प्रशासनाची वाट पाहत होते. ईद असूनही वस्तीत मात्र शोक पसरला होता. नगरिकांनी सण साजरा करण्याऐवजी अदनानला शोधण्यास प्राधान्य दिले. त्यांनी मनपा व अग्निशमनचे अधिकारी आणि नेत्यांशी संपर्क साधून तातडीने शोधमोहिम सुरु करण्याची विनंती केली. दुपारी १ वाजता कळमना येथील अग्निशमन दलाची चमू मुलाला शोधण्यासाठी पोहोचली. भरतवाडा, विहिरगाव, पावनगाव परिसरात अदनानचा शोध घेण्यात आला. अग्निशमन दलाकडे केवळ एकच बोट होती. ती सुद्धा अधूनमधून बंद पडत होती. त्यामुळे मोटर बंद करून ती हातानेच चालवावी लागली. दुसऱ्या बोटीबद्दल विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी ५ वाजता ती चमूही रिकाम्या हातानेच परत गेली.

नेते- अधिकाऱ्यांवर रोष
स्थानिक प्रशासन व नेत्यांच्या वागणुकीने नागरिक अतिशय संतप्त आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, इतकी गंभीर घटना होऊनही वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांनी त्यांची कुठलही विचारपूस केली नाही. पिवळी नदीमध्ये यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. तरीही त्यापासून सुरक्षेची कुठलही उपाययोजना नाही. अदनानच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई, एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. आई मर्जिना मजुरी करते.

अग्निशमन पथक थोडक्यात वाचले
मंगळवारी बचाव कार्यादरम्यान घटनास्थळ परिसरात अग्निशमन पथकातील जवान स्वत:च थोडक्यात वाचले. अग्निशमन पथक बोटीत स्वार होऊन शोध घेत होते. दरम्यान अचानक बोट पलटू लागली. काठावर नागरिक असल्याने त्यांनी दोर फेकून पथकाला वाचवले.

 

 

Web Title: After 36 hours Adnan could not be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.