४८० दिवसाच्या तपानंतर सर्वेश्वरी झाल्या तपेश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 08:10 PM2018-11-13T20:10:33+5:302018-11-13T20:23:57+5:30
त्याग आणि तपाच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न साधूसंतांनी सातत्याने केला आहे. अत्याधिक कठीण परिस्थितीतही ही कठोर साधना करताना ते ध्येयप्राप्तीपासून कधी विचलित झाले नाही. असेच कठीण तप नागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्मलेल्या साध्वी सर्वेश्वरीयशा श्रीजी म.सा. यांनी केला आहे. श्री गुणरत्न संवत्सर महातपांतर्गत साध्वीजींनी ४८० दिवस अन्न ग्रहण न करता ईश्वर भक्तीत स्वत:ला लीन केले. श्रद्धाळूंचे मार्गदर्शन केले व सर्व अडथळे पार करीत हे महातप पूर्ण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्याग आणि तपाच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न साधूसंतांनी सातत्याने केला आहे. अत्याधिक कठीण परिस्थितीतही ही कठोर साधना करताना ते ध्येयप्राप्तीपासून कधी विचलित झाले नाही. असेच कठीण तप नागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्मलेल्या साध्वी सर्वेश्वरीयशा श्रीजी म.सा. यांनी केला आहे. श्री गुणरत्न संवत्सर महातपांतर्गत साध्वीजींनी ४८० दिवस अन्न ग्रहण न करता ईश्वर भक्तीत स्वत:ला लीन केले. श्रद्धाळूंचे मार्गदर्शन केले व सर्व अडथळे पार करीत हे महातप पूर्ण केले.
येत्या १५ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या पालिताणातील चेन्नई तलेटी येथे साध्वीजींच्या तपश्चर्येच्या अनुमोदनार्थ भव्य पारणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी सकल जैन समाजाचे २००० साधूसंत व हजारो श्रद्धाळू पोहचणार आहेत. जगात नागपूर आणि विदर्भाचाही गौरव वाढविणाऱ्या साध्वीजींच्या पारणा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नागपुरातूनही शेकडो श्रद्धाळू गुजरातला रवाना होत आहेत. साध्वीजींचे कौटुंबिक भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी सांगितले, २५०० वर्षाच्या इतिहासात दोन किंवा तीन वेळाच कठीण तप करण्यात आल्याचे मानले जाते. याच महत्त्वामुळे देशासह विदेशातूनही भाविक या पारणा महोत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. ही कठोर साधना पूर्ण केल्यामुळे श्रद्धाळूंकडून साध्वी सर्वेश्वरीयशा श्रीजी म.सा. यांना तपेश्वरी असे संबोधले जात आहे. १४ व १५ नोव्हेंबरला पालिताणा येथे हे भव्य आयोजन होत आहे.
१४ नोव्हेंबरला गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपाणी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखभाई मंडविया, श्री श्री तुलसी महाराज आदी कार्यक्रमात उपस्थित राहतील. याशिवाय अनेक गणमान्य व्यक्तीही या पारणा महोत्सवाचे साक्षी ठरणार आहेत.
यापूर्वीही केली होती तपश्चर्या
मनीष मेहता यांनी सांगितले, १ मे १९७० ला जन्मलेल्या साध्वीजींनी २८ जानेवारी २००१ मध्ये संन्यास ग्रहण केला. सहा वर्षापूर्वी त्यांनी बंगळूरु येथे १११ दिवस आणि तीन वर्षापूर्वी मुंबईमध्ये ८१ दिवसांची तपश्चर्या केली होती. यावेळी ४८० दिवसाचा श्री गुणरत्न संवत्सर महातप त्यांनी २४ जुलै २०१७ पासून सुरू केला होता. आचार्यश्री राजयशसुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेतून साध्वीजींनी गुणरत्न संवत्सर महातप पूर्ण केला. त्या साध्वीवयी वाचंयमा श्रीजी म. सा. व साध्वीवयी दिव्ययशा श्रीजी म. सा. यांच्या शिष्या आहेत.
असे होईल आयोजन
पालिताणा येथे १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता भक्तामर पाठ होईल. ६.३० वाजता तपस्वीचा वरघोडा, ७.४५ वाजता नवकारसी, ९ वाजता जालोरी भवन येथे अनुमोदन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता स्वामी वात्सल्य, २.३० वाजता सांझी व मेहंदी, सायंकाळी ४.४५ वाजता चौविहार व सायंकाळी ७ वाजता महापूजा दर्शन होईल. यानंतर साध्वीजींच्या मातोश्री स्वरूपाबेन अमरचंदभाई मेहता यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त मातृवंदना कार्यक्रम ७.३० वाजता होईल. दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी ६ वाजता भक्तामर पाठ व त्यानंतर मंगल कल्याण पूजेसह पारणा विधीला सुरुवात होईल. दुपारी १२.३० वाजता स्वामी वात्सल्य कार्यक्रम होईल. यावेळी साध्वीजींच्या कुटुंबातील नीता-मनीष मेहता, रजनी-नीलेश मेहता, दीप्तीबेन, भूविश, देवांश, देवांशी, भाग्यांशी, जिनांशी उपस्थित राहतील. विशेष म्हणजे यापूर्वी २७ आॅक्टोबर २०१८ ला वर्धमाननगरच्या हार्दिक लॉन येथे अनुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व यामध्ये आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज, आचार्यश्री गुप्तीनंदीजी गुरुदेव, आचार्यश्री जिनपीयूष सागरजी महाराज आणि समस्त साध्वीवृंद सहभागी झाला होता.