५७ तासानंतर ‘चैतन्य’ आले

By Admin | Published: January 9, 2016 03:14 AM2016-01-09T03:14:21+5:302016-01-09T03:14:21+5:30

सोनेगाव हद्दीतील मनीषनगर येथून गेल्या तीन दिवसापूर्वी सिनेस्टाईल पद्धतीने अपहरण करण्यात आलेल्या एका शिक्षक दाम्पत्याचा मुलगा ...

After 57 hours 'Chaitanya' came | ५७ तासानंतर ‘चैतन्य’ आले

५७ तासानंतर ‘चैतन्य’ आले

googlenewsNext


नागपूर : सोनेगाव हद्दीतील मनीषनगर येथून गेल्या तीन दिवसापूर्वी सिनेस्टाईल पद्धतीने अपहरण करण्यात आलेल्या एका शिक्षक दाम्पत्याचा मुलगा शुक्रवारी रात्री उशिरा खापा परिसरातील बडेगावच्या जंगलात सुखरूप आढळला. पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने चार अपहरणकर्त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलाची सुटका केली.

१४ वर्षीय चैतन्य सुभाष आष्टनकर याचे बुधवारी दिवसाढवळ्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्याच्याच घरासमोरून अपहरण करण्यात आले होते. पोलीस या सर्व अपहरणकर्त्यांना गुप्त ठिकाणी नेऊन त्यांची कसून चौकशी करीत आहे. अपहरणक र्ते हे आष्टनकर कुटुंबीयांशी संबंधित असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसापासून अपहरणकर्त्यांनी अपहृत चैतन्य याचे अपहरण करण्याची योजना आखली होती. चैतन्यचे अपहरण करण्यात आले तेव्हा ही थरारक घटना त्याचा मित्र गौरव ढोमणे याने बघितली होती. त्यामुळे चैतन्यचे अपहरण झाल्याची वार्ता ताबडतोब पोलिसांना आणि त्यांच्या घरच्या लोकांना कळली होती. चैतन्य बुधवारी स्कूल बसने शाळेतून परतला होता. त्यावेळी दुपारचे २.२० वाजले होते. त्याच्यासोबत गौरवसुद्धा होता. दोघेही बसमधून उतरून घराकडे जाऊ लागले. त्याचवेळी मागून सिल्व्हर रंगाची मारुती व्हॅन त्यांच्याजवळ आली. व्हॅनमध्ये समोरील भागात चालकासह अन्य दोघे आणि मागच्या भागात तीन जण बसले होते. त्याचवेळी व्हॅनमधून एक व्यक्ती खाली उतरली. या व्यक्तीने चैतन्यच्या सहकाऱ्याला वर्धमान नगरचा रस्ता विचारला. त्याने माहीत नसल्याचे सांगताच, अपहरणकर्ते चैतन्यकडे वळले. त्यांनी क्षणात चैतन्यचे तोंड दाबून त्याला व्हॅनमध्ये कोंबले आणि सुसाट वेगाने निघून गेले. हे दृश्य बघून गौरव घाबरला होता. त्याने तत्काळ घरी पोहचून ही घटना आपल्या आईला सांगितली. त्याबरोबर गौरवच्या आईने चैतन्यची बहीण गायत्रीला तिच्या घरी पोहचून घटनेची माहिती दिली. त्यावेळी तिचे आईवडील घरी नसल्याने, गायत्रीने फोन करून आईवडिलांना चैतन्यच्या अपहरणाची घटना सांगितली. लागलीच चैतन्यचे वडील सुभाष, आई सुनंदा यांनी घर जवळ करून, सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. (प्रतिनिधी)

शंभरावर गुन्हेगारांची विचारपूस
३६ तास उलटूनही चैतन्यचा शोध लागला नसल्याने पोलिसांनी शहरातील शंभरावर गुन्हेगारांची चौकशी केली होती. सर्व हॉटेल्स, लॉज पिंजून काढले होते. खबऱ्यांकडूनही माहिती घेतली जात होती.

व्हॅन मालकाची चौकशी
अपहरणकर्त्यांच्या वाहनाचा पत्ता लावण्यासाठी पोलिसांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली होती. सूत्रानुसार शहरात संबंधित कंपनीच्या २२०० व्हॅन असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलिसांनी व्हॅन मालकांची यादी प्राप्त केली होती. या आधारावर सुगावा घेतला गेला. त्यातही सिल्व्हर आणि पांढऱ्या रंगाच्या व्हॅन मालकांची यादी तयार करून सखोल चौकशी केली गेली. अपहरणकर्त्यांच्या व्हॅनचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांना अपहरणकर्त्यांचा छडा लावणे सुलभ झाले.

पालकमंत्र्यांची धावपळ
अपहरणाच्या घटनेपासून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अस्वस्थ झाले होेते. वारंवार पोलिसांना सूचना देत होते. तपासाची वारंवार माहिती जाणून घेत होते. चैतन्यच्या कुटुंबीयांना धीर देत होते. त्यांची आस्थेने चौकशी करीत होते. चैतन्य पोलिसांच्या हाती लागताच रातोरात बावनकुळे यांनी चैतन्यचे घर गाठले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.

५० लाखाची मागणी आणि मोबाईल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहरण घटनेच्या तब्बल तीन दिवसानंतर शुक्रवारी सकाळी अपहरणकर्त्यांचा चैतन्यच्या घरी फोन गेला. फोन करणाऱ्याने ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी या माहितीबाबत पूर्णत: गोपनीयता बाळगली. फोन कॉलचे लोकेशन घेतले. तब्बल सहा पथक ांचे जाळे पसरले आणि अपहरणकर्त्यांचा छडा लावला.

Web Title: After 57 hours 'Chaitanya' came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.