नागपूर जिल्ह्यातले फुलझरी ७० वर्षानंतरही अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:28 AM2018-04-02T10:28:47+5:302018-04-02T10:29:01+5:30
ऊर्जेचे हब असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटल्यानंतरही वीज पोहचली नाही. या गावाचे नाव आहे फुलझरी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे. नागपूरला ऊर्जा हब म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अशा ऊर्जेचे हब असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटल्यानंतरही वीज पोहचली नाही. या गावाचे नाव आहे फुलझरी. गाव निव्वळ ऊर्जेच्या बाबतीतच नाही, तर विकासाच्या बाबतीतही अंधारातच आहे. विशेष म्हणजे हे गाव बफर झोनमध्ये येत असल्याने, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे ठाकला आहे. येथील आदिवासींचा वनविभागाशी वनांच्या सानिध्यात राहण्यासाठी लढा सुरू आहे.
रामटेक तालुक्याच्या देवलापार जि.प. सर्कलमध्ये फुलझरी हे गाव येते. फुलझरी गावात ४२ आदिवासी कुटुंब राहत होते. व्याघ्र प्रकल्पासाठी शासनाने या गावाचे पुनर्वसन ४० किलोमीटर दूर संग्रामपूर जवळ केले. मात्र तेथे कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. गावातील २२ कुटुंब पुनर्वसनाच्या ठिकाणी गेले आहेत. आधी वनजमिनीजवळ शेती करणे आणि वनोपज हेच त्यांच्या जगण्याचे साधन होते. त्यामुळे पुनर्वसनाच्या ठिकाणी रोजगार नसल्याने, जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
२० कुटुंब अद्याप फुलझरीमध्येच वास्तव्यास आहेत. त्यामुळे शासनाने या २० कुटुंबांना विकासापासून वंचित ठेवले आहे. वनविभागाने या गावाला गावबंदी केली आहे. गावात येण्यासाठी केवळ कच्ची पायवाट आहे. वन विभागाने लावलेल्या गेट मधूनच गावात प्रवेश करावा लागतो. तसेच गावात कोणत्याही प्रकारे वाहन आणता येत नाही. त्यामुळे काही सामान आणावयाचे असल्यास गेटपासून पायी आणवे लागते. वनविभागाने गावाला तारेच्या कुंपणाने घेरले आहे. पहारा लावण्यात आला असून पांदण रस्ते, तलावाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. शेतातही जाऊ दिल्या जात नाही. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, जिपचे उपाध्यक्ष शरद डोणेकर व तालुक्याचे समाजसेवक देवा वंजारी यांच्यासोबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी फुलझरी गावात पोहचले. तेव्हा गावकऱ्यांनी समस्यांची सरबत्तीच केली.
आदिवासी गाव सोडायला तयार नाहीत
पुनर्वसन झालेल्या ठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गावातील अर्धी कुटुंबे अद्यापही गावातच वास्तव्याला आहेत. आम्हाला वाघ व सापांची भीती नाही. आम्ही त्यांची पूजा करतो. मात्र आम्हाला आमची जमीन व मातीपासून दूर करू नका, अशी व्यथा गावकऱ्यांची आहे.
शाळेची दूरवस्था
गावात अंगणवाडी असून येथे १० मुले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत ७ विद्यार्थी शिक्षण घेतात. गावात सुविधा नसल्याने एक शिक्षक देवलापार तर एक शिक्षिका नागपूर येथून अपडाऊन करतात. शाळेतील शौचालयाची दुरवस्था असून, त्याचा दरवाजाही तुटलेला आहे.