अखेर चित्रपटगृहाला तामिळ-तेलगु सिनेमाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:04+5:302021-01-15T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीर्घकालीन टाळेबंदीनंतर सांस्कृतिक क्षेत्राला मिळालेल्या मोकळीकीनंतरही चित्रपटगृहांची स्थिती सुधारलेली नाही. प्रदर्शनासाठी सिनेमेच नसल्याने चित्रपटगृहांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीर्घकालीन टाळेबंदीनंतर सांस्कृतिक क्षेत्राला मिळालेल्या मोकळीकीनंतरही चित्रपटगृहांची स्थिती सुधारलेली नाही. प्रदर्शनासाठी सिनेमेच नसल्याने चित्रपटगृहांत शांतता अनुभवता येत आहे. ही शांतता भंग करण्याच्या हेतूने चित्रपटगृहांनी गुरुवारी नवा चित्रपट प्रदर्शित केला आहे. संसर्गाचा धोका ओसरत असल्याने प्रेक्षकही सिनेमागृहांकडे वळू लागतील, अशी आशा आहे.
मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी ५ नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक क्षेत्राला टाळेबंदीतून मुक्त केले. त्या आनुषंगाने टाळेबंदीत भरडले गेलेल्या चित्रपटगृहांना सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रदर्शनासाठी नवे सिनेमेच नसल्याने आणि प्रेक्षक येतील की नाही, ही शंका असल्याने जवळपास सर्वच निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांचे प्रदर्शन रोखून धरले आहे. त्यामुळे, मधल्या काळात ‘सुरज पे मंगल भारी’, ‘शकीला’ सारखे सिनेमे प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने पुन्हा एकदा चित्रपटगृहांवर अघोषित टाळेबंदी लागू झाली होती. मात्र, आता स्वत:च पुढाकार घेण्याच्या आनुषंगाने शहरातील चित्रपटगृहमालकांनी दक्षिणेतील चित्रपटांना प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिणेत तुफान गर्दी केलेला नवा कोरा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये ‘विजय मास्टर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकही यायला लागले आहेत. मात्र, ही गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
सध्या ट्रायलच म्हणूयात - प्रतीक मुणोत
अशा अवघडलेल्या काळात आम्हाला ट्रायल करण्याशिवाय पर्याय नाही. आज सिनेते प्रदर्शित करू तर उद्याची वाट मोकळी होणार आहे. त्याच आनुषंगाने दक्षिणेतील सिनेमाने शुभारंभ केला आहे. दुपारच्या शोला ३०-४० प्रेक्षक होते म्हणून शो चालविला. एक-दोन महिन्यांत स्थिती सुधारण्याची अपेक्षा असल्याची भावना पंचशील सिनेमाचे प्रतीक मुणोत यांनी सांगितले.