अखेर गँगस्टर आंबेकर शरण
By admin | Published: March 3, 2016 02:52 AM2016-03-03T02:52:03+5:302016-03-03T02:52:03+5:30
मोक्काअंतर्गत फरार असलेला कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरला अखेर अटक करण्यात आली.
आर्थिक नाकेबंदी केल्याने शरणागती : पोलिसांचा दावा
नागपूर : मोक्काअंतर्गत फरार असलेला कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरला अखेर अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची आर्थिक नाकेबंदी केल्यामुळे तब्बल ३५ दिवस फरार असलेल्या आंबेकरने बुधवारी सकाळी सोनेगाव पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याच्यासोबतच प्रकाश मानकर यालासुद्धा अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे डीसीपी रंजनकुमार शर्मा आणि झोन-१ चे पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी ही माहिती दिली.
सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत स्वप्नील बिडवई नावाच्या व्यक्तीच्या घरावर कब्जा करण्याप्रकरणी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील एकूण ११ आरोपीपैकी गौतम भटकर हा एकमेव आरोपी फरार आहे. सोनेगाव येथील बडवई यांचे घर बळकावण्यासाठी संतोष आंबेकर गँगने त्यांच्या घरावर हल्ला केला. घर खाली करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा भिंतीचीही तोडफोड केली. पोलिसांनी संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणात एकूण ११ आरोपी असून सचिन आडुळकर, विजय बोरकर, लोकेश कुभीटकर, युवराज माथनकर, आकाश बोरकर, शकती मनपिया, विनोद मसराम या आरोपींना अगोदरच अटक करण्यात आली आहे. बुधवारी संतोष आंबेकर आणि प्रकाश मानकर याला अटक करण्यात आली आहे.
संतोष आंबेकरच्या शोधासाठी पोलिसांनी इंदोर आणि मुंबईलाही आपली चमू पाठविली होती. परंतु तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. बुधवारी सकाळी १०.३० वाजता तो तपास अधिकारी सोनेगावचे एसीपी शेखर तोरे यांच्या कार्यालयात हजर झाला. विचारपूस केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्याला अटक करण्यात आली. याचदरम्यान प्रकाश मानकर यालासुद्धा अटक करण्यात आली.
डीसीपी बलकवडे यांनी सांगितले की, पोलिसांनी आंबेकरच्या घरी धाड टाकून चल-अचल संपत्तीचे दस्तऐवज जप्त केले होते. प्रवर्तन निदेशालय (ईडी) आणि आयकर विभागाला याची माहितीही देण्यात आली होती. पोलिसांनी आंबेकरची संपत्ती जप्त करण्याची कारवाईसुद्धा सुरू केली होती. या आर्थिक नाकेबंदीमुळेच तो पोलिसांना शरण आला. त्याला विचारपूस केली असता तो मुंबई, दिल्ली, इंदोर आणि अजमेर येथे गेल्याचे सांगत आहे. परंतु त्याने सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर पोलीस विश्वास ठेवायला तयार नाहीत. प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी तपासून पाहिल्या जात आहेत.
तो पोलिसांची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो खोटं सुद्धा सांगत असल्याचा संशय आहे. तो ज्या हॉटेलमध्ये थांबल्याचे सांगत आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जातील. त्याला स्थानिक गुन्हेगारांनी मदत केल्याचाही संशय आहे. त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाईल.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाई
आंबेकरला काही नेत्यांनी संरक्षण दिल्याचा प्रश्न उपस्थित केला असता, डीसीपी बलकवडे यांनी स्पष्ट केले की, संतोष आंबेकरला पोलिसांपासून लपविण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ज्यांनी मदत केली त्यांचा शोध घेतला जात आहे. यात कुणी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई केली जाईल.