अखेर रुग्णालयांचे होणार आॅडिट
By admin | Published: July 3, 2017 02:24 AM2017-07-03T02:24:19+5:302017-07-03T02:24:19+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्यांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे
मनपाला आली जाग : दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी
गणेश हुड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्यांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी महापालिका प्रशासनाने रुग्णालये सुसज्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रुग्णालयातील रिक्त पदे, यंत्रसामुग्रीचा अभाव, प्रलंबित पुनर्विकास प्रस्ताव , रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या, उपलब्ध सोईसुविधा व अडचणी अशा सर्व बाबींचा अभ्यास करून यावर उपयायोजना करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी महापलिका रुग्णालयांचे आॅडिट हाती घेण्यात आले आहे.
गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचे १९८८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले होते. सुरुवातीला उत्तम देखभाल व सुविधा होत्या. परंतु गेल्या २९ वर्षांत या वास्तूची डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे ही वास्तू मोडकळीस आली आहे. यंत्रसामुग्रीचा अभाव आहे. आयसोलेशन हॉस्पिटल, सदर व पाचपावली रुग्णालयातही अशीच अवस्था आहे. रुग्णालयांना आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करणे व
स्वच्छतेच्या संदर्भात आढावा घेण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमतने वेधले लक्ष
महापालिकेच्या आरोग्य विभागाची प्रमुख सात रुग्णालये आहेत. यात इंदिरा गांधी रुग्णालय, सदर रोग निदान केंद्र, प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्र, आयसोलेशन हॉस्पिटल, पाचपावली मेटर्निटी होम व मलेरिया फायलेरिया विभाग आदींचा यात समावेश आहे. ही रुग्णालये समस्यांच्या चक्रव्यूहात सापडलेली आहेत, यावर उपाययोजना कराव्या. सर्वसामान्यांना महापालिकेच्या रुग्णालयात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात,या हेतूने रुग्णालयांतील समस्यांवर ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. होते. महापौर व आयुक्तांनी यांची दखल घेत रुग्णालयांचे आॅडिट करून आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.