कलाकृतीनंतर लेखिकांनी संयम बाळगावा
By admin | Published: December 29, 2014 02:42 AM2014-12-29T02:42:59+5:302014-12-29T02:42:59+5:30
लेखन आपण आनंदासाठीच करायला हवे आणि हा आनंद इतरांना देण्यासाठी लेखन इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे.
नागपूर : लेखन आपण आनंदासाठीच करायला हवे आणि हा आनंद इतरांना देण्यासाठी लेखन इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. ते लेखिकांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे. पण लेखनानंतर लगेच ते प्रसिद्ध करण्याची घाई मात्र करू नये. थोडा संयम बाळगला तर कलाकृतीत सुधारणा करायला वाव मिळतो आणि लेखन अधिक चांगले व परिपक्व होते. त्यामुळे थोडा संयम नवोदितांनी बाळगणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, माहेर संस्था आणि आकांक्षा प्रकाशनाद्वारे बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय लिहित्या स्त्रियांची तृतीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, संयोजिका अरुणा सबाने प्रामुख्याने उपस्थित होते. भडभडे म्हणाल्या, खूप लेखनापेक्षा दर्जेदार लेखन करावे. त्यात भावना असली पाहिजे. या कार्यशाळेतून अनेक नव्या लेखिका निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
श्रीपाद अपराजित म्हणाले, अधिवेशनाच्या काळात सरकार येथे असताना ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याच्या विधवेने आत्महत्या केल्याचे ऐकीवात नाही. माओवाद्यांनी अनेक महिलांच्या पतींना ठार केले, त्या विधवा आहेत. ग्रामीण भागातल्या या विधवांचे, स्त्रियांचे प्रश्न, संघर्ष समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा ग्रामीण भागात आयोजित करण्याची गरज आहे. ताराबाई शिंदे यांनी ज्या काळात महिलांवर बंधने होती त्या काळात ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे पुस्तक लिहिले. पण आजही अनेक स्त्रिया कौटुंबिक आणि सामाजिक बंधनामुळे लिहिण्यास कचरतात. त्यांना किमान बोलते करता आले तर अनेक नवे अनुभव येतील. स्त्रियांनी त्यांचे अनुभव अधिक भिडस्तपणे मांडण्याची गरज असून, त्यात आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीने केलेल्या अन्यायाचा सूड घेण्याचा विद्वेष असू नये, असे ते म्हणाले. गिरीश गांधी म्हणाले, अरुणा सबाने यांनी आयोजित केलेली ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. स्त्री म्हणून केवळ पुरुषांच्या अन्यायावर न लिहिता त्यापलीकडे जाण्याची वृत्ती स्त्रियांनी ठेवायला हवी. इच्छा असेल तर मार्गही सापडतोच.
स्त्रियांची अभिव्यक्ती अधिक सकसपणे व्हावी यासाठी कार्यशाळेचा उपयोग नव्या लेखिकांना झाला असेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन डॉ. अनुजा भोंडे यांनी आणि आभार अरुणा सबाने यांनी मानले. (प्रतिनिधी)