बंदीनंतरही नागपुरात नायलॉन मांजाने कापले गळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:16 PM2020-01-15T22:16:50+5:302020-01-16T00:09:02+5:30
शहरात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरही त्याचा सर्रास वापर सुरू आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी पतंगबाजी दरम्यान दिसून आला. २५ पेक्षा अधिक लोक मांजाने जखमी होऊन उपचरासाठी मेयो-मेडिकलमध्ये दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरही त्याचा सर्रास वापर सुरू आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी पतंगबाजी दरम्यान दिसून आला. २५ पेक्षा अधिक लोक मांजाने जखमी होऊन उपचरासाठी मेयो-मेडिकलमध्ये दाखल झाले. खासगी रुग्णालयातही मांजामुळे जखमी झालेले अनेक रुग्ण पोहोचले. एकूणच तिळगुळचा गोडवा पतंगबाजीने झालेल्या अपघाताने कमी केला. यापेक्षा शहरात विविध ठिकाणी अनेक जण किरकोळ जखमी झाले, जे रुग्णालयापर्यंत पोहोचलेही नाही अशा लोकांची संख्या १५० पेक्षा अधिक आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मधून मिळालेल्या माहितीनुसार पतंगबाजीदरम्यान जखमी झालेले आठ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. ओपीडीमध्ये ड्रेसिंगसाठी अनेक जण आल्याची माहिती आहे. दोन रुग्णांच्या डोक्याला गंभीर मार बसला. परंतु सध्या ते स्टेबल आहेत. एकाला रुग्णाला सुटी देण्यात आली आहे. व्यंकटेश करेवाड (२०) या तरुणाचे बोट मांजामुळे कापल्या गेले. छतावर पतंग पकडताना टाईल्सवर पडल्याने जीतेश मेश्राम (१३) याच्या डोक्याला मार बसला. अडीच वर्षाच्या सुदयन वासनिक याचे बोटही मांजामुळे कापल्या गेले.
गौरव बोंदरे (२५) याचा उजवा अंगठा मांजाने कापला गेला. तो गंभीर जखमी झाला. ऋतुजा मोहिते (२५) यांच्या डाव्या हाताचा अंगठा व दोन बोट मांजाने कापल्या गेले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये आणल्या गेले. याशिवाय रात्री उशिरापर्यंत मेडिकलमध्ये मांजामुळे जखमी होणाऱ्याची भर्ती सुरूच होती. यासोबतच मेयोमध्ये सुद्धा मांजामुळे जखमी झालेले १२ रुग्ण दाखल झाल्याचे सांगितले जाते. यांच्यावर अकस्मात विभागात उपचार करण्यात आले.
पतंग उडवताना खाली पडून जखमी
केवळ नायलॉन मंजामुळेच लोक जखमी झाले नाही. तर पतंग उडवताना छतावरून खाली पडूनही दोघे जखमी झाले. मेडिकलमध्ये बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता सादिक गुलाम नबी शेख (३५) यांना गंभीर जखमी अवस्थेत मेडिकलच्या ट्रामा केअरमध्ये भर्ती करण्यात आले. हा रुग्ण पतंग उडवताना छतावरून खाली पडला होता. त्याल डोके, स्पाईनह अनेक ठिकाणी मार बसला. ३० वर्षीय पंकज कनोजिया हा सुद्धा पतंग उडवताना उंचावरून खाली पडला.
कारवाईचाही परिणाम नाही
जिल्हा प्रशासन, मनपा, पोलीस यांनी गेल्या पंधरवड्यापासून नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंग विरोधात अभियान राबविले होते. लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला होता. मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉडतर्फे (एनडीएस) मकर संक्रांतीच्या दिवशी कारवाई सुरू होती. बुधवारी एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ९० दुकानांची तपासणी करून ५२३ प्लास्टिकच्या पतंगी जप्त करण्यात आल्या. ८५०० रूपये दंडही ठोठावला गेला. एनडीएसने एकूण ८४८ दुकानांची तपासणी करून ५ हजार प्लास्टिकच्या पतंगी आणि४० चकरी नायलॉन मांजा जप्त केला. एकूण ६९ हजार रुपये दंड ठोठावला. पोलिसां्या कारवाईत अनेक नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई झाली. परंतु आकाशात मात्र ना प्लस्टिकच्या पतंगी कमी झल्या ना नायलॉन मांजा. पतंग उडवणाऱ्यांनी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला. त्याचा फटका वाहन चालक व इतरांना बसला.
तरुण जखमी, कुत्र्यानेही घेतला चावा
मेडिकल रुग्णालयात बुधवारी १३ वर्षीय सुजल वर्मा उपचारासाठी भर्ती झाला. पतंग पकडताना सुजलच्या उजव्या जांघेत लोखंडी रॉडने गंभीर जखम झाली. जखमी अवस्थेत सुजल घरी जात होता, परंतु त्याचवेळी त्याला एका कुत्र्यानेही चावा घेतला. आधीच जखमी असलेल्या सुजलला कुत्र्याने चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाला. त्याला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
मनपाचे फायरमॅन, कंत्राटदारही जखमी
नायलॉन मांज्यामुळे मनपाचे एक फायरमॅन व कंत्राटदारही जखमी झाले. अग्निशमन विमोचक मकरंद सातपुते हे बुधवारी सकाळी घरून सिव्हील लाईन्स येथील मुख्यालयात जाण्यासाठी बाईकने निघाले. दरम्यान सकाळी ९.३० वाजता पिपळा रोड संजय गांधीनगर येथे नायलॉन मांजाने त्यांची मान कापल्या गेली. त्यांनी हेल्मेट व जर्सी घातली होती. तरीही मांजाने त्यांच्या गळ्याला वेढा घातला. त्यांनी लगेच गाडी रोखल्याने अपघात टळला. परंतु मान कापल्या गेली. तसेच भुतेश्वरनगर जवळील साईटवर काम पाहण्यासाठी गेलेले मनपाचे कंत्राटदार रमजान भाई यांचेही गाल व नाक नायलॉन मांजाने कापल्या गेले. दोघांनीही प्राथमिक उपचार घेतला.