धुळवडीचा रंग बेरंग; रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 12:12 PM2022-03-19T12:12:56+5:302022-03-19T12:21:51+5:30
रंगपंचमी साजरी करून बोर नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगेश इंगळे व देवानंद पवार, असे मृत तरुणांची नावे आहेत.
नागपूर : जिल्ह्यातील शिवा (सावंगा) येथे रंगपंचमीनंतर बोर नदीवर आंधोळीकरिता गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. देवानंद विनोद पवार (वय २३) व मंगेश यादवराव इंगळे (वय २३, रा.वार्ड क्रमांक १ शिवा तालुका नागपूर ग्रामिण) असे मृत तरुणांची नावे आहेत.
कोंढाळीपासून २० कि.मी अंतरावरील शिवा येथील काही तरुण रंगपंचमीच्या उत्सवानंतर गावापासून १ कि.मी अंतरावर असलेल्या बाजारगाव-शिवा मार्गावरील ब्रम्हलीन तपकिरी महाराज मंदिर गोपालपूरी येथील बोर नदीच्या पात्रात आंघोळीला गेले होते. बोर नदीपात्रात पुलाखाली पाणी खोल तसेच पाण्यात गाळ असल्याने व दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दोन तरुण नदीत बुडाल्याची माहिती समोर येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंढाळी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार पोलीस निरिक्षक चंद्रकांत काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानीय लोकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी नागपूर शासकीय रुग्णालयात पाठविले.
ऐन रंगपंचमीच्या दिवशी शिवा येथील दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली. मृतक देवानंदचे वडिल सोलार कंपनीत काम करतात. त्याला एक विवाहित मोठी बहिण आहे तर मृतक मंगेशला दोन भाऊ एक बहिण आहे. त्यात मंगेश हा सर्वात लहाण होता. मंगेशचे वडील शेतमजुरी करतांत. घटनेचा पुढील तपास कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे करीत आहेत.